![वाकडमध्ये चार दुकाने आगीत भस्मसात; सात तासांनंतर आग विझवण्यात यश -](http://mymarathi.net/wp-content/uploads/2015/03/0-300x171.jpg)
वाकडमध्ये चार दुकाने आगीत भस्मसात; सात तासांनंतर आग विझवण्यात यश –
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरातील विशालनगरमध्ये एका व्यावसायिक-रहिवासी इमारतीतील चार दुकानांना आज पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पहाटे तीन नंतर ही आग लागल्याचे रहिवाशांनी सांगितले. आग लागलेल्या दुकानापैकी एक आईलपेंट रंग विक्रीचे मोठे दुकान असल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात साठा असल्याने सहा-सात तासानंतरही आग आटोक्यात येत नव्हती. अखेर महापालिकेच्या १२ बंबांनी सकाळी १० च्या सुमारास आग आटोक्यात आणली. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीचा तडाखा वर राहणा-या सर्व रहिवाशांना बसला. सुरक्षेसाठी इमारतीतील सर्व 60 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आईलपेंट कलरला आग लागल्याने या परिसरात धुराचे लोळ उठत होते.
वाकडमधील आयटी पार्कमधील लोक विशालनगर भागात राहतात. तेथील स्प्रिंग मिडोज या व्यावसायिक तथा रहिवासी इमारत आहे. या बिल्डिंगच्या खालीलभागात दुकाने आहेत तर वरच्या मजल्यावर लोक राहतात. या इमारती खाली एक रंगाचे व हार्डवेअर दुकान आहे. यात सर्व रासायनिक व आईलपेंट रंगाचा मोठा साठा होता. पहाटे या दुकानाला अचानक आग लागली. रासायनिक रंग हे ज्वालाग्राही असल्याने आगीने तत्काळ रौद्ररुप धारण केले. त्यामुळे शेजारच्या दुकानांनीही लागलीच पेट घेतला. दुकाने जळून खाक झाली आहेत तर इमारतीत धूर तयार झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.