‘वनवासी कल्याण आश्रम’आयोजित ‘रानभाजी महोत्सव’ला चांगला प्रतिसाद
पुणे :
भीमाशंकर जवळील आहुपे या दुर्गम गावी वनवासी कल्याण आश्रम आयोजित ‘रानभाजी’ महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे पन्नास आदिवासी महिलांनी या रानभाजी महोत्सवात रानभाज्या बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला.
मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील सुमारे 150 जणांनी या महोत्सवात हजेरी लावली. आदिवासी महिलांनी भारंगी, तेरा, कुर्टुले, खुराळ सारख्या 27 वेगवेगळ्या भाज्या तयार केल्या होत्या. 39 महिलांनी स्पर्धेत भाग घेतला होता. सर्वांनी आदिवासी घरांमध्ये अतिथी पाहुणे जाऊन रानभाज्या युक्त भोजनाचा आस्वाद घेतला.
वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विनया घाटे, प्रा. शिंदीकर, प्रा. महेश शिंदीकर, मीनल लाड यांनी परीक्षण केले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ‘वनवासी कल्याण आश्रम’चे जिल्हाध्यक्ष शांताराम इंदोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सीता पारधी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शासकीय आश्रमशाळा वनविभाग, आदीवासी बहुविध सेवासंस्था यांनी संयोजनात सहकार्य केले.
‘वनवासी कल्याण आश्रम’चे जिल्हाध्यक्ष शांताराम इंदोरे, मिलींद देशपांडे, अंजली घारपुरे, अल्पिता पाटणकर, यांनी यासाठी परिश्रम घेतले.