मुंबई : राष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी आजच्या युवा पिढीने सार्वजनिक कार्यात सहभागी होणे ही काळाची गरज आहे. लोकशाही प्रक्रियेत युवा पिढी सहभागी झाली तरच देशाच्या प्रगतीची गती वाढेल, त्यामुळे युवा पिढीने लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमार्फत सहाव्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. ही संसद 27 ते 30 जानेवारी 2016 दरम्यान पुण्यात होणार आहे. या संसदेचा बुधवारी घंटानाद (क्लेरीयन कॉल) मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मौलाना रिझवी, पद्मश्री आलेक पदमसी, डॉ. विश्वनाथ कराड, राहुल कराड, अभिनेते मिलिंद गुणाजी, उद्योजक माणिक रुपानी, भारतीय छात्र संसदेचे विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारताच्या लोकशाहीत तरुणांचा सहभाग ही काळाची गरज आहे. भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून युवकांना देशाच्या लोकशाहीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चार दिवस चालणारी ही संसद म्हणजे प्रशिक्षित तरुण राजकीय नेते घडविणारे उत्तम माध्यम आहे. आजच्या युवा पिढीमध्ये लोकशाहीबद्दल अनास्था आहे. ही अनास्था दूर करुन लोकशाहीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. आज भारतात तरुणांची लोकसंख्या पाहता ही काळाची गरज असून, असे केले तर देशाच्या प्रगतीची गती वाढणार आहे.
युवा पिढीने जर लोकशाही समजून घेण्याची इच्छाशक्ती दर्शविली तर भारताची लोकशाही किती समृद्ध आहे, याची त्यांना माहिती मिळेल. भारतीय छात्र संसद ही भारतातल्या युवा शक्तीला अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळेच सहाव्या भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून मी आज सर्वांना आवाहन करतो की, या संसदेत सहभागी व्हा आणि आपल्या कल्पना मांडा. भारतीय छात्र संसदेच्या या उपक्रमाला आपण निश्चित पाठिंबा देऊ, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.