पुणे- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींचा पैसा रिकव्हर करण्याचा अजिबात विचार नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या तेळी ते बोलत होते.
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ४८ वी वार्षिक सर्व साधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर आले.सुरुवातीला अजित पवार आणि शरद पवार यांची बंद दार आड चर्चाही झाली , व्यासपीठावर ते शेजारी बसणार होते मात्र आयत्या वेळी अजित दादांनी आसनव्यवस्था बदलली.सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवारां शेजारी बसविले ,त्यांना साहेबांशी बोलायचं असल्यानं जागा बदलल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आपल्या देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये उपस्थित झाला आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता अशा मोठ्या शहरांमध्ये देखील तेथील नागरिक येत आहेत. त्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सैफ अली खानवरील हल्ला देखील बांगलादेशी व्यक्तीने केला असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. लाडकी बहीण योजना ही आम्हाला आधार कार्डशी लिंक करायची होती. मात्र वेळ कमी असल्यामुळे ते शक्य झाले नाही. मात्र आता खरोखरच लाडक्या बहिणींना लाभ द्यायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हळूहळू पावले उचलत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांकडून सरकारने दिलेले पैसे परत घेऊ, असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी केले होते. मात्र टीकेची झोड उठताच त्यांनी अपात्र महिलांकडून सरकार पैसे परत घेणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. तटकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेना आणि भाजप मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. दावोस येथूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तटकरेंची कानउघाडणी केल्याचे समजते.