आपला हात भारी.. आपली लाथ भारी.. आपलं सगळंच लय भारी म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकुळ घालणारा चित्रपट म्हणजे ‘लय भारी’. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक गोष्टी मराठीमध्ये प्रथमच घडल्या. हिंदी चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने याद्वारे मराठीत पदार्पण केलं. मराठीत पहिल्यांदाच बिग बजेट आणि अॅक्शनपॅक्ड सिनेमा बघायला मिळाला. मराठीत प्रथमच जिनिलीया डिसूझा-देशमुख एका गाण्यावर थिरकतांना दिसली तर बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान चक्क मराठीत डायलॉगबाजी करताना दिसला. या सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली गोष्ट म्हणजे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेली रेकॉर्डब्रेक कमाई. मराठी चित्रपटांचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत या चित्रपटाने तब्बल चाळीस कोटी रूपयांची कमाई केली. एकंदरीत सर्वच बाबतीत “लय भारी” ठरलेल्या या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या “लय भारी” वाहिनीवर म्हणजेच झी मराठीवर सायंकाळी ७ वा. तत्पूर्वी ‘लय भारी’च्या मेकिंगची धम्माल दाखवणारा एक कर्टन रेजरचा भागही ६.३० ला प्रसारित होणार आहे.
“लय भारी”ही कथा आहे माऊलीची. यात रितेशने साकारलेल्या भूमिकेचं नाव माऊली आहे तसंच ही कथा त्याच्या माऊलीच्या म्हणजेच आईच्या प्रेमाची आहे आणि तेवढीच ती अवघ्या महाराष्ट्राची माऊली असणा-या विठु माऊलीच्या भक्तीचीही आहे. या दोन्ही माऊलींच्या सन्मानासाठी लढणारा नायक माऊली यातून प्रेक्षकांना बघायला मिळाला आणि अवघ्या महाराष्ट्राने या माऊलीला डोक्यावर उचलून धरले. यातला नायक जेवढा लोकप्रिय झाला तेवढीच लोकप्रियता यातील खलनायकालासुद्धा मिळाली. हा खलनायक साकारला होता हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता शरद केळकरने. याशिवाय चित्रपटात तन्वी आझमी, उदय टिकेकर, संजय खापरे, आदिती पोहनकर आणि राधिका आपटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात अॅक्शनचा मसाला असला तरी तो नुसता अॅक्शनपट न उरता कथा आणि पटकथेच्या पातळीवरही तो आशयपूर्ण आणि प्रभावी बनवण्याचं काम दिग्दर्शक निशिकांत कामतने केलं. ‘लय भारी’च्या डायलॉग्स आणि अॅक्शनइतकीच लोकप्रिय ठरली ती यातील अजय-अतुल यांनी संगितबद्ध केलेली गाणी. विशेषतः विठु माऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारक-यांच्या उत्कटतेचं दर्शन घडवणारं “माऊली माऊली” या गाण्याने तर अवघा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघाला.
एकंदरीत प्रेम, अॅक्शन, गाणी, नृत्य, मैत्री, भक्ती असा मनोरंजनाचा देमार मसाला असलेला हा “लय भारी” चित्रपट आता छोट्या पडद्यावरही धुमाकुळ घालण्यास सज्ज झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून देणा-या या “लय भारी”चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर रंगणार आहे रविवारी २५ जानेवारीला सायंकाळी ७. वा. फक्त झी मराठीवर.