कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन
पुणे : विविध प्रकारची मिठाई, फळे, खाद्यपदार्थ, चॉकलेट, बिस्किटे, लाडू, जिलेबी, पेढे, काजूकतली अशा सुमारे १०१ पदार्थांचा अन्नकोट दत्तमहाराजांसमोर मांडण्यात आला. बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नकोट व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वारात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती़. तसेच गाभारा फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता.
दत्तमंदिरातील अन्नकोटामध्ये ठेवण्यात आलेले पदार्थ ट्रस्टतर्फे तसेच भाविकांनी दिलेल्या पदार्थांमधून मांडण्यात आले. मंदिरातील सेवेक-यांनी अन्नकोटाची मांडणी केली. अन्नकोटासाठी मांडण्यात आलेले पदार्थ सामाजिक संस्थांना देण्यात येणार असून उर्वरित पदार्थ मंदिरामध्ये भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी सांगितले.