पुणे, :वीज चोरी कशी होवू शकते याचा जबरदस्त पराक्रम आता उघड झाला आहे . चक्क रिमोटने विजेच्या मीटरवर नियंत्रण ठेवणारी क्लुप्ती पुण्यात वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे
नांदेड गाव येथे अक्षय इंडस्ट्रीज या बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
रिमोट कंट्रोलद्वारे होणारी वीजचोरीची क्ल्युप्ती महावितरणने उघड केली आहे. पुणे शहरात असा वीजचोरीचा प्रकार
प्रथमच आढळून आला आहे. या बर्फाच्या कारखान्यात तब्बल 83 हजार 138 युनिट्सच्या 11 लाख 92 हजार 738 रुपयांची
वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की नांदेड येथील सर्व्हे क्र. 10 मधील मे. अक्षय इंडस्ट्रीज हा बर्फाचा कारखाना वीजग्राहक
आशा यशवंत धनकुडे यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातील वीजवापराच्या विश्लेषणातून संशय निर्माण झाल्याने
कारखान्यातील वीजयंत्रणेची तपासणी करण्यात आली. सदर कारखान्यात असलेल्या वीजमीटरच्या यंत्रणेत फेरफार केल्याचे
आढळून आले. सिटी सर्कीटमध्ये फेरफार करून त्यात रिमोट कंट्रोल सर्कीट समाविष्ट केल्याचे दिसून आले. या सर्कीटच्या
सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे वीजमीटरमधील नोंदी सोयीनुसार थांबविता येत असल्याचे दिसून
आले. रिमोट कंट्रोलचे सर्कीट बेमालुमपणे व छुप्या पद्धतीने लावल्याने वीजचोरी शोधून काढणे आव्हान होते. तथापि
महावितरणच्या अभियंता व कर्मचार्यांनी रिमोट कंट्रोलद्वारे सुरु असलेल्या वीजचोरीचा कौशल्याने छडा लावला. गेल्या 24
महिन्यांच्या कालावधीत अक्षय इंडस्ट्रीजमध्ये 83,138 युनिट्सच्या 11 लाख 92 हजार 738 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे
सदर कारखान्यातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक
अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. उदय चामले, श्री. दत्तात्रय बनसोडे, अतिरिक्त
कार्यकारी अभियंता श्री. दिलीप कोकणे, श्री. विजय सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता शिवलिंग बोरे, वैशाली पगारे, तंत्रज्ञ शैलेश
बनसोडे, राम पवार आदींनी योगदान दिले.
वीजचोरीप्रकरणी अक्षय इंडस्ट्रीजचे मालक आशा यशवंत धनकुडे विरुद्ध मंगळवारी (दि. 13 ऑक्टो.) रास्तापेठ (पुणे) येथील
महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम 135 व 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.