पंढरपूर येथे आज आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापुजेनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती अमृता फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती खडसे, मानाचे वारकरी राघोजी नारायणराव धांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती धांडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, श्रीमती क्षत्रिय, मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकरी सुखी झाला तर राज्य सुखी होईल. आज या शासकीय महापुजेचा मान मिळाला हा माझ्या जीवनातील भाग्याचा दिवस आहे. यामधून मिळालेली शक्ती, ऊर्जा याचा वापर राज्यातील सामान्य माणसाच्या कल्याणासाठी करु. तसेच पंढरपूरच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी राघोजी नारायणराव धांडे व श्रीमती धांडे यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत शासकीय महापुजेचा मान मिळाला. श्री.धांडे हे पिंपरी खुर्द ता. कळमनुरी जि.हिंगोली येथील रहिवासी असून गेली 16 वर्षे पायी वारी करीत आहेत. तसेच त्यांनी परदेश दौराही केलेला आहे.




