रायगड : राज्यातील गडकिल्ल्यांचे वैभव परत आले पाहिजे अशी आमची भूमिका असून यासंदर्भात आपली केंद्रीय पुरातत्व विभागाचे मंत्री महेश शर्मा यांच्यासमवेत चर्चा झाली आहे. भारतीय पुरातत्व सर्व्हेने राज्य पुरातत्व विभागाशी सामंजस्य करार करून त्याद्वारे किल्ल्यांचे गतीने संवर्धन करावे, अशी विनंती आपण केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रायगड किल्ल्यावर आयोजित रायगड महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता, आमदार सर्वश्री भरत गोगावले, सुनील तटकरे, जयंत पाटील, प्रशांत ठाकूर, विनायक मेटे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दीडपट जादा निधी
छत्रपतींच्या काळातला रायगड उभा करण्यासाठी आणि हे काम गतीने पूर्ण होण्यासाठी जेवढा निधी वित्तमंत्र्यांनी निश्चित केला आहे त्यापेक्षा दीडपट जादा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या गजरात जाहीर केले.
पाचाड गावात जलयुक्त शिवार योजना
पाचाड येथे जिजाऊच्या वाड्याचे संवर्धन करणे आवश्यक असून याठिकाणी वर्षानुवर्षे असलेल्या पाणी टंचाईचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, पाचाड गावात जलयुक्त शिवार योजना संपूर्णपणे राबवून याभागातल्या तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. पुढील काळात याठिकाणी पाण्याच्या टँकर्सची आवश्यकता भासणार नाही. आम्ही सगळे मंत्री या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.
किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आराखडा
गडकिल्ल्यांचे वैभव परत मिळवून देण्यासाठी आमच्या सरकारने आराखडा तयार केला आहे. त्यात रायगड, शिवनेरी, तोरणा असे ५ किल्ले निवडले आहेत. याठिकाणी पर्यटकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी तिथे पर्यटन केंद्र उभारण्यात येईल. याद्वारे किल्ल्यांचा इतिहास भाषांतरकाराच्या माध्यमातून विविध भाषांत पर्यटकांना सांगितला जाईल त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभूती येईल.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकारबद्दल व रायगड महोत्सवाचे चांगले आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की, शिवराय हे रयतेचे राजे होते. आम्ही रयतेचे सेवक म्हणून काम करून दाखवू. या महोत्सवाच्या निमित्ताने एक नवा अध्याय सुरु होत आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे. हरवलेली विजीगिषु वृत्ती, क्षात्र धर्म, शौर्य पुनर्स्थापित करण्याचे काम महाराजांनी केले. एक राजा पालक म्हणून कसा काम करू शकतो ते त्यांनी जगाला दाखविले. आजच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर छत्रपतींचा इतिहास वाचला तर मिळते असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आपल्या स्फूर्तीदायी भाषणाच्या शेवटी त्यांनी “ जय भवानी जय शिवाजी” असा नारा देताच प्रेक्षकांनी देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वातावरणात चैतन्य आणले.
यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी देखील प्रास्ताविक करताना आपले विचार मांडले. ते म्हणाले की, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी या विशेष रायगड महोत्सवासाठी निधी उपलब्ध करून दिला असून यामुळे रायगड किल्ला हा जागतिक नकाशावर येण्यास मदत होईल. देश विदेशातील पर्यटकांना रायगडचा गौरवशाली इतिहास कळवा हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. यामुळे या परिसरात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पर्यटन व्यवसाय वाढून रोजगार निर्मिती देखील होईल. छत्रपती हे खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट गुरु होते.
अनंत गीते म्हणाले की, दोन पिढ्यांमध्ये अंतर वाढत असून रायगड हा छत्रपतींच्या काळात जसा होता तसाच पहायला मिळणे आवश्यक आहे तरच त्याकाळचा इतिहास लोकांना कळेल.
याप्रसंगी रायगड दर्शन या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ ऐवजी रायगडाची स्फुर्तीगाथा हे पुस्तक भेट देण्यात आले. याप्रसंगी कला दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या शिवराय आणि संभाजी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची घोषणाही करण्यात आली.
याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, सांस्कृतिक खात्याच्या सचिव वळसा नायर, रायगडाच्या जिल्हाधिकारी शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे सांस्कृतिक विभागाचे संचालक अजय अंबेकर आदींची उपस्थिती होती.
रायगडावर शिवसृष्टी अवतरली
शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास दाखविण्यासाठी रायगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी पाचाड येथे प्रत्यक्ष शिवसृष्टी उभारण्यात आली असून किल्ल्यावर देखील महादरवाजा, सभामंडप, राणीवसा, अष्टप्रधान मंडळ, बाजारपेठ, होळीचा माळ, समाधी स्थळ येथे इतिहासकालीन सजावट करण्यात आली आहे.
महोत्सव सर्वांसाठी खुला
२४ जानेवारीपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून रायगड किल्ल्यावर सकाळी ९ पासून संध्याकाळी ५ पर्यंत महादरवाजा, सभामंडप, राणीवसा, अष्टप्रधान मंडळ, बाजारपेठ, होळीचा माळ, समाधी स्थळ यांची इतिहासकालीन सजावट करण्यात येणार आहे. शाहिर, वासुदेव, भारुडकर आणि गोंधळी शिवस्तुती सादर करणार आहेत. गडाच्या पायथ्याशी पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यात आली असून सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत शिवकालीन इतिहास कथन करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिववैभवाचे दर्शन घडविणाऱ्या शिवसृष्टीत शिवराज्याभिषेक सोहळा, शिवकालीन नाणी प्रदर्शन, किल्ल्यांच्या प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे, इतिहासतज्ज्ञांच्या व्याख्यानमाला, लोककलांचे दर्शन, ढोलताशांची आतषबाजी, शिवकालीन कथांचे कथाकथन उलगडून दाखविणारे दृकश्राव्य कार्यक्रम, पालखी, कीर्तन, भारुड, गोंधळ असे सोहळे आयोजित करण्यात आले आहे.