रत्नागिरी, निवळी घाट येथे झालेल्या अपघातात 10 गंभीर रूग्णांना मिळाले ‘डायल 108’ मुळे जीवदान
रत्नागिरी (बावंडी, हातखंबा):
रत्नागिरी, निवळी घाट (बावंडी, हातखंबा) येथे झालेल्या एसटी आणि कंटेनरच्या अपघातातील 32 अपघातग्रस्त जखमींना ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवेद्वारे तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यात आली. अपघातानंतर अवघ्या 7 मिनिटांमध्येच ‘डायल 108’ च्या चार रूग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रूग्णांवर ‘डायल 108’ रूग्णवाहिकेद्वारे घटनास्थळी उपचार करून नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
अपघात झालेल्या एसटीमध्ये अडकलेल्या अत्यंत गंभीर 10 रूग्णांवर डायल 108 रूग्णवाहिका टिमच्या वतीने आधी अडलेल्या एसटीतच प्रथमोपचार करण्यात आले, व बाहेर काढण्यात आले. या वेळीच दिलेल्या प्रथमोपचारामुळे या 10 गंभीर रूग्णांचे प्राण वाचविण्यात डायल 108 रूग्णवाहिका टिमला यश मिळाले. प्रथमोपचारानंतर रूग्णांना ‘रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक मंदार कार्लेकर यांनी दिली.
22 अपघातग्रस्त जखमी रूग्णांवर ‘डायल 108’ सेवेच्या रूग्णवाहिकेद्वारे तत्काळ वैद्यकीय उपचार करून ‘रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल’ मध्ये दाखल करण्यात आले.
मदतकार्यामध्ये ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’चे जिल्हा व्यवस्थापक मंदार कार्लेकर यांच्या समवेत डॉ. विवेक कामत, डॉ.मंदार आमणे, डॉ. धर्मेंद्र पोतदार, डॉ. प्रसन्न लिंगायत, राजाराम शिंदे (वाहन चालक), महेश वाडकर, काशिनाथ टेपाडे, गणेश पाथरे, संतोष भोंगळे, वैभव साळवी आदींचा सहभाग होता.