पुणे, : यंदाच्या १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येत्या १४ तारखेपासून सुरुवात होणार असून राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
सेल्सो आर गार्शिया दिग्दर्शित ‘थिन यल्लो लाईन’ या मेक्सिकोच्या चित्रपटाने महोत्सवाला सुरवात होणार असून विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेमध्ये यावर्षी ऋत्विक घटक, गिरीश कासारवल्ली व जानू बरुआ या दिग्गजांना ऐकण्याची संधीही चित्रपट चाहत्यांना मिळेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. हे व्याख्यान सोमवार, दिनांक १८ जानेवारी रोजी दुपारी १.१५ वाजता सिटी प्राईड कोथरूड येथे होणार असल्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
गुरुवार दिनांक, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता सिटी प्राईड कोथरूड येथे होणा-या उद्घाटनपार कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी सौमित्र चॅटर्जी व प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’, प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना कलेच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड’ हे पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत.
या वर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी, सर्बियाचे चित्रपट समीक्षक नेनाड ड्युकिक, डेन्मार्कचे दिग्दर्शक नील्स मल्म्रोज, भारताच्या अभिनेत्री मलाया गोस्वामी, अर्जेंटीनाचे दिग्दर्शक पाब्लो सीझर, इटलीचे दिग्दर्शक फॅब्रिझिओ फेरारी, अमेरिकेचे दिग्दर्शक डॅनियल रेन व इराणच्या दिग्दर्शक रेझा डॉर्मिशियन हे ज्युरी म्हणून काम पाहतील याबरोबरच भारतातील विविध देशांच्या दूतावासाचे राजदूत, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित असतील, अशी माहितीही यावेळी डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
महोत्सवाचे हे १४ वे वर्ष असून ‘स्पोर्टस् अॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर’ असा यावर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा विषय आहे. हा महोत्सव येत्या १४ ते २१ जानेवारी दरम्यान रंगणार असून पुणे शहरातील कोथरूड सिटी प्राईड, सातारा रस्ता सिटी प्राईड, आर डेक्कन सिटी प्राईड, मंगला मल्टीप्लेक्स, कॅम्प मधील आयनॉक्स, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व पिंपरी-चिंचवड मधील जय गणेश आयनॉक्स या ठिकाणी महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार आहेत.