मराठी सिनेमाचा चेहरा बदलत असून आजच्या तरुणाईला आकर्षित करणारे कथाविषय या चित्रपटात
मांडण्यात येताहेत. मैत्री, प्रेम या पलीकडे जात तरुणांचे नातेसंबंध, भावबंध, आयुष्याबद्दलचे विचार त्यांच्या
नजरेतून दाखविले जात आहेत. अगदी आत्ताआत्तापर्यंत मराठी चित्रपट हा केवळ मध्यमवयीन मंडळींपुरताच
मर्यादित होता. परंतु अलीकडच्या काळात तरुणांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट निर्माण होऊ लागले आहेत,
मराठी चित्रपटात होत असलेला हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.
‘मुव्हिंग पिक्चर्स’ प्रस्तुत, ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ हा असाच एक युथफुल सिनेमा लवकरच
प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मराठी सिनेमाची निर्मिती नितीन तेज अहुजा, अशोक भूषण यांची असून, सहनिर्माते
सई देवधर आनंद आणि शक्ती आनंद आहेत. तरुणाईचा हाच जोश, सळसळता उत्साह श्रावणी देवधर
दिग्दर्शित ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ या मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. अँक्शन, इमोशन, फन,
रोमान्स आणि ड्रामा असलेला हा चित्रपट येत्या ५ जूनला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत या युथफुल कलाकारांसोबत मकरंद
अनासपुरे, पुष्कर श्रोत्री हे हरहुन्नरी कलाकार या चित्रपटात आपल्या अफलातून अभिनयाने आणि विनोदाच्या
टायमिंग सेन्समुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणार आहेत. ‘मुव्हिंग पिक्चर्स’ निर्मिती संस्थेच्या ‘साटं लोटं..
पण सगळं खोटं’ चित्रपटात श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाची कमाल बऱ्याच अवधीनंतर नव्याने
अनुभवायला मिळणार आहे. ‘थॅाटट्रेन एंटरटेनमेंट’ च्या सहकार्याने निर्माण झालेल्या ‘साटं लोटं’ ची खिळवून
ठेवणारी कथा श्रावणी देवधर यांनी लिहिली असून पटकथा-संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिलेत. श्रीरंग
गोडबोले लिखित यातील गीतांना युवा संगीतकार सिद्धार्थ महादेवन व सौमिल शृंगारपुरे यांनी सुरेल संगीत
दिलंय. चित्रपटाचे छायांकन राहुल जाधव यांनी केलंय. फ्रेश लूक, उत्तम कथानक, वास्तवदर्शी मांडणी, नेटकं
दिग्दर्शन, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञांची साथ असलेला ‘साटं लोटं’
आजच्या तरुण पिढीला नक्कीच आवडेल असा आहे.
आगळ्या वेगळ्या कलाकृतींद्वारे आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या संवेदनशील दिग्दर्शिका
श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला वेगळ्या धाटणीचा ‘साटं लोटं..पण सगळं खोटं’ नक्कीच
प्रेक्षकांची निखळ करमणूक करणारा ठरेल.