नवी दिल्ली-कोणत्याही धर्माविरुद्ध भेदभाव किंवा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशी तंबी रा. स्व. संघासह सर्वच हिंदुत्ववादी संघटनांना दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मुस्लिमांसाठी काय पण’ करायची तयारी दाखवली आहे. रात्री १२ वाजता जरी तुम्ही माझं दार ठोठावलंत, तरी मी तुमच्यासाठी उपलब्ध असेन, असं वचन त्यांनी मंगळवारी मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिलं. स्वतःला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवणाऱ्या मोदींच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत असलं, तरी ‘धर्मनिरपेक्ष पंतप्रधान’ अशी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न मानला जातोय.
देशातील १२५ कोटी जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडून राजकारण करण्यावर माझा विश्वास नाही आणि धार्मिक भेदभावाची भाषा मी कधीही बोलणार नाही, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली. अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इल्यासी यांच्या नेतृत्वाखालील ३० मुस्लिम सदस्यांच्या शिष्टमंडळनानं मोदींची काल ‘शब्बे बारात’च्या रात्री भेट घेतली, तेव्हा ४५ मिनिटांच्या चर्चेत मोदींनी त्यांना विकासाची खात्री दिली. विरोधकांची टीका ऐकून माझं मूल्यांकन करू नका, तर माझं काम पाहून माझी पारख करा, असं आवाहनही त्यांनी मुस्लिम नेत्यांना केलं.