‘लायन्स क्लब इंटरनॅशल-२०१५‘ ने घेतली स्वच्छतेची जबाबदारी
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास साद देत ‘लायन्स क्लब इंटरनॅशल-२०१५’ तर्फे मुठा नदीपात्राची स्वच्छता व साफसफाई या मोहिमेचा शुभारंभ झाला. या शुभारंभाव्दारे पर्यावरणीय आठवड्याची सुरुवात करण्यात आली आहे.
भिडे पुल येथील नदीपात्रात या मोहिमेस सकाळी नऊ वाजता अधीक्षक अभियंता(पाटबंधारे) अतुल कपोले यांच्या शुभहस्ते सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष लायन हसमुख मेहता, समन्वयक लायन बाळासाहेब पाथरकर, लायन हेमंत नाईक, लायन श्रीकांत सोनी (व्हिडीजी-१), लायन चंद्रहास शेट्टी, लायन अशोक मिस्त्री (सचिव) हे उपस्थित होते. यावेळी बोलताना कपोले म्हणाले, “मुठा नदीवरील ‘पानशेत’, ‘वरसगांव’, ‘टेमघर’ व ‘खडकवासला’ ही चार धरणे शहरास व शेतीस पाणीपुरवठा करण्यासाठी बंदिस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या मुठा नदीतून केवळ सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तेव्हा, घरात पाण्याचा अपव्यय टाळावा. ‘लायन्स क्लब’ ही सेवाभावी संस्था नेहमीच सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर राहून समाजहिताची कामे करित असते. नदीपात्राची स्वच्छता हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.” मुठा नदीपात्राच्या दोन्ही बाजुस कॅालेजमधील तरुण-तरुणी व शेकडो शालेय विद्यार्थी यांनी कचरा साफसफाई केली.
पर्यावरण जनजागृती, रक्षण व संवर्धन यास चालना देण्यासाठी ‘लायन्स सर्व्हिस फोरम’ तर्फे ‘लायन्स इन्व्हॅारन्मेंट एक्स्पो’ (प्रदर्शनाचे ) व विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी लायन्सचे सदस्य, शालेय विद्यार्थी, अनेक स्वयंसेवी संस्थांचे सदस्य व पाटबंधारे खात्याचे कर्मचारी यांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. पुढील आठवडाभर गार्डन स्वच्छता, पथनाट्य, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा या माध्यमातून पर्यावरणीय आठवडा साजरा करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये ‘नेस वाडिया कॅालेज’, ‘अग्रीकल्चर कॅालेज शिवाजीनगर’, ‘बरदारी स्कुल’, ‘प्रतिभा कॅालेज’, ‘जलबिरादारी’, ‘हौ.सो. महासंघ’ यांचा सहभाग उल्लेखनिय होता.
आभार लायन आनंद आंबेकर यांनी व्यक्त केले.