नवी दिल्ली- मुंबईच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी केंद्र सरकारला दिल्लीत झटपट निर्णय घेता यावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या विकासासाठी एक समिती स्थापन करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केंद्रीय नियोजन आयोगाच्या फेररचनेबाबत पंतप्रधानांनी बोलविलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली.
देश आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने मुंबई हे सर्वात महत्त्वाचे शहर असून, मुंबईच्या विकासाचे अनेक निर्णय केंद्राला दिल्लीत घ्यावे लागतात. त्यात मुंबईचे प्रकल्प रखडतात. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार झाली पाहिजे आणि तिने मुंबईशी संबंधित निर्णय झटपट घेतले पाहिजेत, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या आणि चांगले काम करणाऱ्या राज्यांना केंद्राकडून अधिक पैसा मिळावा, अशी मागणी आपण बैठकीत केली, असेही फडणवीस यांनी सांगितले.