पुणे-महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री मधुकरराव पिचड यांनी त्यांच्या द्वितीय पत्नी कमळ मधुकर पिचड या आदिवासी नसताना त्यांचा खोटा व बनावट आदिवासी जातीचा दाखला बनून त्याआधारे आमच्या पक्षकार सून सरोज जितेंद्र पिचड यांची संपत्ती हडप करून फसवणूक केली आहे. त्यांची दुसरी पत्नी कमळ पिचड या हिंदू मराठा असताना मधुकर पिचड यांनी बनावट कागदपत्रे तयार करून घेतली, त्याचवेळी सून सरोज जितेंद्र पिचड यांच्या जबरीने अनेक कागदपत्रांवर सह्या आणि स्वतःच्या ओळखींचा फायदा घेऊन सरकारी रेकॉर्डमध्ये फेरफार करून घेतले. बोगस आदिवासी दाखले तयार करून सुनेचे 5 कोटी रुपये त्यांनी हडप केले, असा आरोप अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
सरोदे म्हणाले, बनावट आदिवासी दाखल्याच्या आधारे कमळ पिचड यांच्या नावाने जमिनी फेरफर करून घेतल्या. त्या सर्व जमीन मिळकती समृद्धी महामार्गात विक्री करून त्याद्वारे शासनाकडून साधारणत: पाच कोटी रुपये घेतले आहेत, हे पाच कोटी रुपये त्यांची सून सरोज पिचड हिला मिळणे आवश्यक होते. तसेच त्याव्यतिरिक्त अन्य शेतकऱ्यांचे देखील मिळकती अशाच प्रकारे बेकायदेशीर बळकावून त्यातून देखील कोट्यवधी रुपये मिळविले आहे. त्याबाबत सहआयुक्त अनुसूचित जाती जमाती तपासणी समितीकडे 2018 सालापासून तक्रारी आहेत. पण सरकारी अधिकारी मधुकर पिचड यांच्या दबवाखाली वागतात.
या सर्वांबाबत सरोज जितेंद्र पिचड यांनी पोलीस निरीक्षक शहापूर यांच्याकडे रीतसर तक्रार देऊन देखील पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने आम्ही जिल्हा व सत्र न्यायालय कल्याण येथे खासगी तक्रार दाखल केलेली आहे. सदर केस कोर्टाने दखल घेऊन मधुकर पिचड, कमळ पिचड व संबंधितांवर कारवाई का केली जाऊ नये, याबाबतची नोटीस बजावणीचा आदेश दिलेले आहे. सदर प्रकरणाची पुढील तारीख 25 ऑक्टोबर रोजी आहे.अशा प्रकारे कमळ पिचड यांनी आदिवासी नसताना आदिवासी जमिनी बेकायदेशीर बळकवून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा मिळविला आहे त्यास मधुकर पिचड यांचे राजकीय पाठबळ असून ते सध्या सत्ताधारी भाजपमध्ये असल्याने त्यांच्यावर पोलिस कारवाई करत नाही.
मधुकर पिचड व इतरांविरोधात त्यांची सून सरोज पिचड यांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार सुद्धा केस दाखल केलेली आहे, अशी माहिती अॅड. असीम सरोदे यांनी दिली आहे.