मुंबई- मागच्याच सरकारचा पाढा पुढे वाचला जाणार असेल तर काही उपयोग नाही. आपला शत्रू पाक रोज काहींना काही कुरापती काढून आपल्याला बेजार करीत आहे आणि आपण त्यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करण्यात काहीही अर्थ नाही. काँग्रेसने हेच केले. आता सरकार बदलले आहे. त्यामुळे लोकांना बदल होईल अशी अपेक्षा आहे. पण तसे काही होताना दिसत नाही. मोदींकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. जशास तसे उत्तर देण्याची त्यांच्यात धमक आहे. ते त्यांनी केले पाहिजे नाहीतर लोकांचा अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजप व मोदींनाआज लक्ष्य केले.आज रशियात झालेल्या मोदी -शरीफ भेटीमुळे चर्चेमुळे शिवसेना नाराज असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे
मोदी -शरीफ भेट
पंतप्रधान मोदी सध्या रशिया दौ-यावर आहेत. तेथे आज सकाळी मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. . मोदी-शरीफ यांची नियोजित 45 मिनिटांची बैठक तब्बल दीड तास चालली. यावेळी शरीफ यांनी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले. मोदींनी ते निमंत्रण स्वीकारले. 2016 साली पाकिस्तानात सार्क परिषद होत आहे. या परिषदेचे व पाक भेटीचे मोदींनी शरीफ यांच्याकडून निमंत्रण स्वीकारले. दोन्ही देशांनी याचे स्वागत केले. रशियातील उफामध्ये दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळासह बैठक घेतली. किमान दिड तास ही बैठक चालली. या बैठकीत तीन प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आले. भारताच्या शिष्टमंडळात अजित डोवल आणि परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा समावेश होता. तर पाकिस्तानच्या शिष्टमंडळात शरीफ यांचे परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजिझ हे सहभागी झाले होते.
अपेक्षाभंग करू नका -शिवसेना
खासदार संजय राऊत यांनी मोदी-शरीफ भेटीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तासाभरातच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर निशाणा साधला.
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मोदी-शरीफ भेटीवर नाराजी व्यक्त करीत मैत्रीचा हात पुढे करण्याची काँग्रेसप्रमाणेच चूक करू नका असा सल्ला दिला.ते म्हणाले पाकिस्तान देश आपल्या सीमेवरील जवानांना रोज मारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. पहिल्यासरकार प्रमाणेचआताही तेच घडत आहे. मात्र, मोदींत जशास तसे उत्तर देण्याची धमक आहे, ते त्यांनी दिले पाहिजे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले .