पुणे :
चांदणी चौक येथील नाकाबंदीदरम्यान वाहतूक विभागातील निरीक्षकासह कर्मचाऱ्यांनी श्रीमती पुजा भाले या महिलेशी विनयभंग आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार सोमवारी 1 जून रोजी रात्री घडला. पोलीसांकडून विनयभंग, मारहाण झाल्याच्या प्रकाराबाबत खासदार ऍड.वंदना चव्हाण यांनी पोलीस आयुक्त श्री. के.के.पाठक यांना या कायद्याने गंभीर गुन्ह्याची दोन दिवसात दखल घेण्यात यावी या विषयीचे पत्र सादर केले आहे.
हा एक गंभीर गुन्हा असून, कायद्याने यावर कारवाई केली जावी. पोलिसांनी महिलांशी गैरवर्तन करणे योग्य नाही. या अत्यंत गंभीर गुन्ह्याची दोन दिवसांत दखल घेतली जावी अशी मागणी खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
श्रीमती भाले या एनडीए रस्त्यावर कुटुंबासह राहतात. यांनी सोमवारी सायंकाळी तिच्या मित्राला, तसेच कुटुंबियांना जेवावयास बोलावले होते. भाले यांचा मित्र असलेली कार पोलीसांनी अडविली; तसेच त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला नाही. मात्र तरीही पोलिस घरी जाण्यास परवानगी देत नव्हते. त्यांनी मदतीसाठी श्रीमती भाले यांना बोलावले असता तेथे पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने विनयभंग केला, अशी तक्रार पुजा भाले यांनी केली आहे.
धक्काबुक्की करीत श्रीमती भालेच दारू प्यायल्या आहे का ?अशी तपासणीची सक्तीही केल्याचा भाले यांचा आरोप आहे. भाले यांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर त्या वेळी असलेले गस्तपथकाचे पोलिस घटनास्थळी धावून आले. आणि त्यांनी सर्वांना पोलिस चौकीत नेले असता, तेथेदेखील वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यंानी भाले यांच्यासह मित्रांना धक्काबुक्की केली. तसेच, तेथे देखिल भाले दारू प्यायल्या आहे का, असे म्हणत वारंवार ब्रीदऍनालाइझर करण्याची जबरदस्ती केल्याचे भाले यांच्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे चार-पाच तास या सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागला.