पुणे- महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्या. तसेच पक्षातील महिला कार्यकर्त्यांची गळचेपी केली. त्यामुळे व्यवहारे यांना पदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी, महिला आघाडीच्या शहर कार्याध्यक्षा शोभना पणीकर, उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी महिलांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या पदाधिकारी म्हणाल्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाची पिछेहाट होण्यास प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांची पक्षविरोधी भूमिकाही कारणीभूत आहे. पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यापासून त्यांनी अनेक महिला कार्यकर्त्यांना रोखले. प्रसंगी त्यांना धमकावलेही. पुणेच नव्हे तर अन्य जिल्ह्यातही पक्षातील प्रामाणिक महिला कार्यकर्त्यांना डावलून ज्यांचा पक्षाशी संबध नाही, अशांना पदाची संधी देण्यात आली.