महिलांना अधिकाधिक सक्षम होण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक : खासदार अॅड.वंदना चव्हाण
पुणे:
स्फूर्ती महिला मंडळ व स्माईल (सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूट फॉर लेडिज एम्पावरमेंट) या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने सर्व वयोगटातील महिलांसाठी मंगळागौरीच्या खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, खजिना विहीर येथे पार पडला. स्पर्धेमध्ये सागरिका इंद्रायणी ग्रुपने (भोसरी) प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्या गटांना स्फुर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा खासदार अॅड.वंदना चव्हाण आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी निलीमा दाणी, संगीता बेलवणकर आणि स्पर्धेच्या परिक्षक नेहा दांडेकर उपस्थित होत्या.
स्पर्धेचे द्वीतीय क्रमांकाचे पारितोषिक स्वराली ग्रुप (येरवडा), तृतीय क्रमांकाचे पारितोषिक क्षितीजा ग्रुप (पिंपरी-चिंचवड) तर उत्तेजनार्थ पारितोषिक महालक्ष्मी ग्रुपने मिळविले. प्रदीप्ता कुलकर्णी यांनी स्पर्धेचे संयोजन केले होते.
यावेळी महिला शाहीर विनीता जोशी यांनी झाशीची राणी यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला.
स्फुर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘मंगळागौर सारख्या पारंपारिक खेळांमुळे महिलांचे आरोग्य तंदुरूस्त राहण्यास मदत होऊ शकते. अशा पारंपारिक खेळांतून मिळणारा आनंद वेगळा आहे. महिलांना अधिकाधिक सक्षम होण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे. या मंगळागौर स्पर्धेमध्ये समाज प्रबोधन होण्यासाठी सामाजिकतेचे संदेश देणारे विषय महिलांना देण्यात आले होते. सर्वच गटांनी उत्कृष्ठ सादरीकरण केल्याने मला आनंद झाला आहे.’
याप्रसंगी बोलताना अश्विनी कदम म्हणाल्या, ‘महिला सक्षम असेल तर ती संपूर्ण कुटूंबाला सक्षम बनवू शकते. स्पर्धेचे विषय सामाजिक बांधिलकी जपणारे होते. त्यातून समाजापर्यंत संदेश पोहोचविण्याचे काम या महिलांद्वारे करण्यात आले हे स्तुत्य आहे.’
स्पर्धेमध्ये पुणे शहरातील विविध भागातून एकूण वीस गट सहभागी झाले होते. प्रत्येक गटांत 10 ते 16 महिला होत्या. एकत्र कुटुंब पद्धती आणि पर्यावरण संरक्षण हे स्पर्धेचे विषय होते. स्पर्धेमध्ये सहभागी गटांतील महिलांनी पर्यावरण संरक्षण, मुलींच्या जन्माचे स्वागत, स्वच्छ पुणे, कचरा जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, कचरा निर्मुलन, एकत्र कुटुंब पद्धती अशा विषयांतून सामाजिकतेचे संदेश दिले. आणि या विषयांवर गाणी व खेळांचे सारदरीकरण केले होते. ही स्पर्धा इंद्रधनुष्य हॉल, सचिन तेंडुलकर उद्यानाजवळ, राजेंद्रनगर, म्हात्रे पूल, पुणे येथे झाली होती.