पुणे:
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या राजकीय हिताला बाधा पोहोचवणाऱ्या आणि कार्यकर्त्यांचा विश्वासघात करणाऱ्या अंतर्गत कारस्थानाची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे (AICC) उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष अरविंद तुकाराम शिंदे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर संघटनात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
अरविंद शिंदे यांनी पत्रात मांडलेले मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
- काँग्रेसला निवडणुकीतून जाणीवपूर्वक बाजूला ठेवले: पुण्यात काँग्रेसकडे सक्षम संख्याबळ आणि भाजपला थेट आव्हान देण्याची क्षमता असतानाही, पक्षाला निवडणुकीच्या रिंगणातून दूर ठेवण्यात आले. हा प्रकार काँग्रेसजनांच्या स्वाभिमानावर घाला घालणारा आहे.
- आघाडीच्या नावाखाली अंतर्गत डाव: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे उमेदवार शशिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ऐनवेळी घेतलेली माघार ही सामान्य राजकीय घटना नाही. काँग्रेसचा पाठिंबा घ्यायचा, त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवायचे आणि शेवटच्या क्षणी समीकरणे बदलून अप्रत्यक्षपणे भाजपला लाभ मिळवून द्यायचा, असा पूर्वनियोजित राजकीय डाव यात रचला गेल्याचा संशय निर्माण झाला आहे.
- नेतृत्वाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेतृत्वाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात असून, पुणे शहर काँग्रेस, स्थानिक पदाधिकारी आणि संपर्क नेते श्री. सतेज पाटील यांना पूर्णपणे अंधारात ठेवावे लागले. हे निर्णय कोण्याच्या दबावाखाली घेण्यात आले, असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

