मराठी तारे-तारकांचा एसिड हल्ल्यात बळी पडलेल्या तरुणींबरोबर ‘रेम्प वॉक’
(पुणे-विवेक तायडे)
एकतर्फी प्रेमातून एसिड हल्ल्याला बळी पडलेल्या तरुणींचे मनोधैर्य उंचावण्यासाठी ”रेड एफएम’ (९३.५)” ने नामवंत मराठी तारे-तारकांचा अशा पिडीत तरुणींबरोबर ‘रेम्प वॉक’ चा खास कार्यक्रम गेल्या रविवारी आयोजित केला होता. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक जाणीवेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ‘सीझन मॉल’ (मगरपट्टा सिटी) येथे ”रेड एफएम’ तर्फे झालेल्या ‘सत्व : आंतरिक बळ’ या विशेष कार्यक्रमाची संकल्पना आरजे श्रुती यांची होती. त्यांनीच केलेल्या बहारदार सूत्रसंचालनाने हा कार्यक्रम शेवटपर्यंत रंगत गेला. या कार्यक्रमात ‘नटरंग’ फेम सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, सौरव गोखले, अजिंक्य देव, अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर आदी तारे-तारकांनी ‘रेम्प वॉक’ केला. निवेदिता साबू यांनी केलेले डिझाईन आणि अस्मिता जावडेकर यांची ज्वेलरी रचना यामुळे या ‘रेम्प वॉक’ मधील प्रत्येकजण विशेष खुलून दिसत होता.
प्रारंभी सोनाली कुलकर्णी यांनी ‘रेम्प वॉक’ला सुरुवात केली. त्यानंतर एसिड हल्ल्याला बळी पडलेल्या शायना, कविता, मोहिनी आणि ममता या पिडीत युवतींनी रंगमंचावर ‘रेम्प वॉक’ केला. त्यावेळी प्रेक्षक श्वास रोखून त्यांना पाहत असल्यामुळे वातावरण अतिशय भावूक झाले होते. यावेळी आरजे श्रुती यांनी आपल्या निवेदनात, एसिड हल्ल्यानंतर धैर्याने सामोरे गेलेल्या या पिडीत युवतींच्या साहसी मनोधैर्याबद्दल कौतुक केले त्यावेळी उपस्थितांनी त्यांना मानाचा मुजरा केला. सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, सौरव गोखले, अजिंक्य देव, अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना या पिडीत युवतींच्या धैर्याला ‘सलाम’ केला. अमृता सुभाष यांनी यावेळी ‘फिरुनी नवे जन्मुनी मी….’ हे गाणे गाऊन त्यांना वेगळाच दिलासा दिला. याप्रसंगी प्रेक्षकांमध्ये एका अपंग मुलीची माता असलेली शरिफा नावाची महिला इतकी भावनावश झाली की, तिने या पिडीत युवतींचे दु:ख पाहून आपल्या अपंग मुलीचे दु:ख त्याच्यापुढे काहीच नाही अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.
तत्पूर्वी सुप्रसिध्द शिल्पकार विवेक पाटील यांनी वाळूच्या आधारे एसिड हल्ल्याला बळी पडलेल्या युवतीचा जीवन प्रवास रेखाटला. त्यालाही उपस्थित प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. नृत्यांगना नुपूर दैठणकर यांनीही यावेळी विशेष नृत्य सादर करून या कार्यक्रमाची रंगत वाढविली.