विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या ‘भो भो’ चित्रपटाने कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही आपला ठसा उमटवला आहे. या चित्रपटासाठी अभिनेते प्रशांत दामले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे
२१ फेब्रूवारीला कल्याण स्पोर्ट्स क्लबच्या पटांगणात रंगलेल्या ‘कल्याण फिल्म फेस्टिव्हल’च्या सोहळ्यात प्रशांत दामले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘अत्यंत वेगळी कथा व भूमिका यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. माझ्या वेगळ्या भूमिकेसाठी मिळालेल्या या पुरस्काराबाबत मी निश्चितच आनंदी आहे’, असं प्रशांत दामले ह्या वेळी म्हणाले.
सुमुखेश फिल्म्स प्रस्तुत आणि भरत गायकवाड दिग्दर्शित ‘भो भो‘ हा वेगळ्या पठडीतला चित्रपट आहे. ‘भो भो‘ ही एका कुत्र्याभोवती फ़िरणारी मर्डर मिस्ट्री असून या चित्रपटात प्रशांत दामले ह्या अगोदर कधीच न पाहिलेल्या भूमिकेत दिसतील. त्यांच्यासोबत सुबोध भावे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, संजय मोने, किशोर चौगुले, सौरभ गोखले आणि अनुजा साठे या कलाकारांच्या ही भूमिका आहेत.
वेगळ्या कथाविषयामुळे ‘भो भो’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच पूर्ण मनोरंजन करेल असा विश्वास निर्माता दिग्दर्शक भरत गायकवाड यांनी व्यक्त केला.

