डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक व मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे उभारण्यात येणारे स्मारक लोकशाहीवर विश्वास असणाऱ्यांसाठी प्रेरणास्थळ बनेल अशा पध्दतीने त्याची निर्मिती करा. लोकसहभागातून स्मारकाच्या परिसरात वृक्षारोपण करुन निसर्गसंपन्न वातावरणात स्मारक उभारा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत पाच स्थळांचे स्मारकात रुपांतर करुन त्यांचे पंचतीर्थ उभारण्यात येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
येथील बांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दहिसर ते डीएनए नगर मेट्रो आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रोचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. त्यावेळी झालेल्या सभेत पंतप्रधान बोलत होते. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विजय साखला, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यु. पी. एस. मदान व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान यावेळी म्हणाले की, ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. हा दुग्धशर्करा योग आहे. बाबासाहेबांचे इंदू मिलमध्ये जे स्मारक बनविण्यात येणार आहे. त्याची निर्मिती अशा पध्दतीने करा की, तेथे आल्यावर प्रत्येकाला शांती मिळेल. याठिकाणी वृक्षारोपण करुन ते निसर्गरम्य बनवा. हे स्मारक फक्त विटा, सिमेंट यापासून न बनवता लोकसहभागातून त्याची निर्मिती करा. महाराष्ट्रात आज सुमारे 40 हजार गावे आहेत. प्रत्येक गावातून एक वृक्ष आणून ते स्मारकाच्या ठिकाणी लावण्यात यावे आणि या वृक्षाच्या संवर्धनासाठी त्या गावाने 11 हजार रुपये लोक वर्गणी जमा करावी. त्याच बरोबरच देशातील सर्वच राज्यातून एक-एक रोप आणून आणि सर्व जगभरातूनदेखील झाडे मागवून ते या स्मारकाच्या ठिकाणी लावण्यात यावे. या स्मारकाचे सारे विश्व वृक्ष संपदेने व्यापून जाईल. देशात तयार झाले नसेल असे हे स्मारक बनले पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेले विचार प्रेरणादायी आहेत. त्याप्रमाणेच त्यांचे स्मारकदेखील प्रत्येकासाठी प्रेरणास्थळ बनले पाहिजे. असा प्रयत्न झाला पाहिजे. बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत जी पाच ठिकाणे आहेत. त्यांचा पंचतीर्थ म्हणून निर्माण करण्यात येणार आहे. त्यामध्ये महू (मध्यप्रदेश) येथील बाबासाहेबांचे जन्मस्थळ, दिल्ली येथील अलिपूर रस्त्यावरील वास्तू जेथे बाबासाहेबांचे वास्तव्य राहिलेले आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेगाव, इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आणि लंडन येथील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले घर या पाच वास्तूंना स्मारकाचा दर्जा देऊन त्यांचे पंचतीर्थ म्हणून विकसित केले जाणार आहे.
डॉ.बाबासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय दिला. बाबासाहेब हे फक्त दलितांचे नव्हे तर जगातील सर्व शोषितांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी देशाला संविधान दिले. त्यामुळे त्यांच्या या कार्याची प्रेरणा आणि त्याबाबतची माहिती नव्या पिढीला व्हावी. यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याचे आम्ही ठरविले आहे, असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, हे स्मारक लवकरात लवकर व्हावे यासाठी जो पुढाकार घेतला आहे यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो.
आमचे सरकार आल्यापासून देशात विकासाला गती मिळाली आहे. जी कामे गेल्या दहा वर्षात झाली नाही. ती गेल्या 15 महिन्यात करण्यावर आम्ही भर दिला आहे. देशात आज प्रतीदिन 15 कि. मी. लांबीचे रस्ते तयार होत आहेत. वाढणारी शहरे ही संधी आहे, असे म्हणून बदलत्या शहरांच्या जीवनशैलीसाठी उपयुक्त पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस अभिनंदन करतो. त्यांनी मुंबई मेट्रोचा डीपीआर कमीत कमी कालावधीत तयार करुन त्याला गती दिली आहे. शहरातील पायाभूत सुविधांबरोबरच समुद्र किनाऱ्याच्या राज्यांमधील बंदरांचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणावर आम्ही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. बंदरे जर सक्षम असतील तर आर्थिक व्यवस्था गतीशील असते. त्यामुळे आम्ही बंदर विकासाच्या कामांना गती दिली आहे. ‘मेक इन इंडिया’ संकल्पना यशस्वी करीत असताना देशांतर्गत गुंतवणूक करणारे उत्पादकांकडून देशात जे उत्पादन होईल, तो माल जागतिक बाजार पेठेत पाठविण्यासाठी ह्या बंदरांचा मोठा फायदा होणार आहे. बंदरांना जोडणारे रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक आणि शीतगृहांची साखळी ह्या सुविधा आवश्यक आहेत. देशातील संपूर्ण समुद्र किनारा जोडणारा सागर माळा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आम्ही सुरु करीत आहोत. समुद्र किनारे असलेल्या राज्यांचा त्यामध्ये सहभाग असेल. पुढील काळ हा सामुद्रीक आणि अंतराळ क्षेत्राचा असल्याने भारत या दोन्ही क्षेत्रात पुढाकार घेईल, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
देशातील सिंचन क्षमता वाढविणे आवश्यक आहे. पावसावर शेती अवलंबून असल्याने शेतकऱ्याला दुष्काळाचा सामाना करावा लागतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या राबविण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे महाराष्ट्र भविष्यात दुष्काळावर मात करेल, असा मला विश्वास वाटतो असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की फक्त 1400 कोटी रुपये खर्च करुन राज्यातील 6200 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सिंचनाचे काम केले आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी 300 कोटी रुपयांचा निधी लोकवर्गणीतून जमा झाला आहे ही अभिनंदनीय बाब आहे. अशाच पध्दतीने सिंचन क्षमता वाढवून महाराष्ट्र कृषी क्षेत्रात आघाडीवर राहून देशाला नवी दिशा देण्याचे काम करेल असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांनी पुढाकार घेतल्यामुळे आजचा इंदू मिलच्या जागेवर स्मारक उभारण्याचा सोहळा संपन्न होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षात राज्य शासनाने 125 कोटी रुपये मागासवर्गीय बांधवांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. इंदू मिलच्या जागेवर उभे राहणारे बाबासाहेबांचे स्मारक हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बाबासाहेब लंडनमध्ये शिकत असताना ते ज्या घरात राहत होते. ते घर खरेदीची प्रक्रिया आमचे शासन सत्तेवर आल्यावर गतीमान झाली आणि लंडनमधील ती वास्तू राज्य शासनाने खरेदी केली. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेबांचे स्मारक व्हावे यासाठी सामान्य दलित बांधवांनी वेळोवेळी आंदोलने केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता मात्र आम्ही हे गुन्हे तातडीने मागे घेणार आहोत. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या समतेच्या विचाराने चालणार आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळत आहे. राज्यातील आणि मुंबईसारख्या महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्तारण्यावर आमचा भर आहे. मुंबईला स्मार्ट सिटी करायचे असेल तर स्मार्ट ट्रान्सपोर्ट व्यवस्थेचे जाळे उभारण्याची गरज आहे. यासाठीच मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून 2019 पर्यंत मुंबईमध्ये 108 कि. मी. लांबीचे मेट्रोचे नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. मेट्रोसोबतच उपनगरीय रेल्वेचे जाळे देखील वाढविण्यात येणार आहे. रेल्वे, मेट्रो, मोनो आणि बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचे एकत्रित सांगड कशी घालता येईल याचे नियोजन आम्ही करीत आहोत. त्याअंतर्गत एकाच तिकीटावर या चारही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून प्रवास करण्याची संधी मुंबईकरांसाठी उपलब्ध करुन देता येईल, यावर आम्ही भर दिला आहे. ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड सारख्या प्रकल्पांच्या माध्यमांतून मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व प्रकल्पांमध्ये केंद्राचे सहकार्य मिळत असल्याने पूर्वी ज्या परवानग्यांना सात ते आठ वर्ष लागायचे ते आता दोन ते तीन महिन्यातच मिळत असल्याने प्रकल्पाच्या कामांना चालना मिळाली आहे. 2019 पूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय शहर बनविण्यासाठी आमचा निर्धार आहे. जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढवून राज्यातील गावांगावातील दुष्काळ दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, देशाला विकासाकडे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या आठ हजार कोटी रुपयांच्या कंटेनर टर्मिनलचे आज भूमिपूजन झाले. त्यामुळे सुमारे 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात अपेक्षित असून सुमारे सव्वा लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. बंदरांचा विकास करण्यावर भर दिला असून त्यामुळे देशात पहिल्यांदाच बारा बंदरे आणि तीन महामंडळे नफ्यामध्ये आली आहेत. येत्या सहा महिन्यात बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामाला शुभारंभ करण्यात येईल, असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंतप्रधानांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार आठवले यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेच्या ठिकाणी दादर येथील चैत्यभूमी व इंदू मिल येथील स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. कार्यक्रमास राज्य मंत्रीमंडळातील सदस्यांबरोबरच खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.