पुणे- सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यात मागील चार-पाच दिवसांत सपशेल अपयशी ठरलेल्या पोलिसांनी आता आपले नैराश्य पत्रकारांवर काढण्यास सुरुवात केली आहे. आपले तपासाचे ‘कौशल्य’ उघडे पडल्याने पोलिसांनी पत्रकारांनाच दमदाटी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र मंगळवारी बोपदेव घाट परिसरात पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरण घडलेल्या घटनास्थळाला भेट दिली. यावेळी, वार्ताकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. तसेच, काही प्रसार माध्यमांना भेदभावाची वागणूक केली. पोलिसांनी प्रसार मध्यमांबाबत घेतेलेली भूमिका निषेधार्ह असून संबंधित पोलिसांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.