हंटररर या चित्रपटाचे ये ना गडे हे नवीन गाणे आज, पुणे येथे सायंकाळी
6 वाजता प्रसिध्द करण्यात आले. गाण्याचे शब्द विजय मौर्य यांनी
लिहीले असून खामोश शाह यांनी त्याला संगीत दिले आहे. मराठीतील
दिग्गज गायक आनंद शिंदे आणि वैशाली माडे यांनी हे गाणे गायले आहे.
मराठी चित्रपट संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक आनंद शिंदे यांनी हे
गाणे गाताना खूप धमाल केली, खामोश यांच्या रचनेचे त्यांनी खूप कौतुक
केले. वैशाली माडे यांनी प्रथमच हिंदी चित्रपटासाठी गाणे गायले असून
त्यांनाही या चित्रपटाचे संगीत आवडले.
खामोश म्हणाले की, “या चित्रपटात असा एक प्रसंग आहे ज्यात काही
मित्र घरात पार्टी करत असतात.
मराठी पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात दिग्दर्शक हर्ष यांना या
प्रसंगात एक मराठी गाणेच हवे होते. ऐकताच पाय थिरकतील अशी प्रचंड
ऊर्जा आणि जोम या गाण्यात असावा अशी माझी कल्पना होती. ये ये ना
गडे ही एक ओळच माझ्या मनात घोळत होती, ती मी गाऊन पाहिली आणि
आम्हाला एक हटके गाणे मिळाले.”
विजय मौर्य यांनी हे संपूर्ण गाणे मजेदार पध्दतीने लिहीले आहे, यात
श्रीमंत असा गावचा प्रमुख आपल्या फॉर्महाऊसवर आपल्या प्रेयसीसह
प्रेमाचे काही क्षण घालवू इच्छितो, पण त्याला या क्षणांची मजा
हळुहळू घ्यायची आहे.
“मी मराठी गाणी ऐकतच लहानाचा मोठा झालो, त्यामुळे माझ्या
चित्रपटातही मला एक धमाकेदार मराठी गाणे हवे होते”, असे दिग्दर्शक
हर्षवर्धन कुलकर्णी सांगतात. “जेव्हा खामोश आणि विजय ये ना गडे हे
गाणे घेऊन आले तेव्हा ते आम्हाला खूप आवडले.”
सई ताम्हणकर म्हणाली की, “हंटरररर चित्रपटातील प्रत्येक गोष्ट
आगळीवेगळी आणि हटके आहे, हे गाणेही त्याला अपवाद नाही. विजयने
हे गाणे अप्रतिम लिहीले असून हे गाणं ऐकल्याक्षणी तुमचे पाय थिरकू
लागतात. त्यातही हे गाणे मराठीत असल्याने मला ते खूपच आवडले.”
राधिका आपटे म्हणाली की, “मला या गाण्यातील ऊर्जा आणि
खासकरुन त्याची मांडणी मला प्रचंड आवडली. या गाण्याच्या
चित्रिकरणादरम्यान आम्ही खूप धमाल केली, प्रेक्षकांनाही हे गाणे
आवडेल अशी मला आशा आहे.”
हंटरररर हा आधुनिक काळातील चित्रपट असून त्याचे लेखन आणि
दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी यांनी केले आहे. चित्रपटात गुलशन
देवय्या, राधिका आपटे आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका
आहेत.
हंटरररर 20 मार्च 2015 रोजी प्रदर्शित होणार आहे.