पुणे- महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय , गुन्हेगारी वाढलीय , महिला मुलांवरील अत्याचार वाढलेत या आरोपांना राज्य सरकारमधील गृह खात्याने कायमच हलक्यात घेतले , या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर गुन्ह्याची उकल होणे महत्वाचे , गुन्हे तर वाढतच राहणार असे बोलत वाढत्या गुन्हेगारीचे एकप्रकारे समर्थनच चालविले . पण आता खुद्द सत्तेतील माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने गृहखात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जनाची नाही तर मनाची तरी बाळगून सरकार याची जबाबदारी घेणार आहे कि नाही , असा प्रश्नच विचारू नये एवढी निलाजरी स्थिती सध्याच्या राजकारणात दिसते आहे. जेवढी कधीच नव्हती .विजयादशमीच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलीवूड आणि भाजपा नेत्यांनी मौन पाळलेय,मात्र विरोधी पक्षातील विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
शरद पवार
अतिशय धक्कादायक! मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी.
-सुप्रिया सुळे
बाबा सिद्दिकी यांच्यावरील गोळीबार अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईतील बांद्रासारख्या ठिकाणी, त्यातही माजी राज्यमंत्र्यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीवर हा हल्ला होणं यातून राज्याची कायदा व सुव्यवस्थेची कोलमडलेली स्थिती कळते. मागील वर्षभर राज्यातील कायदा व सुव्यवस्था टांगणीला लागलेली आहे. प्रत्येक प्रसंगानंतर सत्ताधारी केवळ वेळ मारून नेत आहेत. पण हा हल्ला अत्यंत गंभीर असून याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यायलाच हवी. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटूंबियांना या संकट काळात सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माझे जवळचे मित्र, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त अतिशय धक्कादायक व हादरवून टाकणारे आहे. आम्ही विधीमंडळात एकत्र काम केले. मंत्रिमंडळातही आम्ही सोबत होतो. त्यांचे नेतृत्व लोकांशी नाळ जुळलेले व सर्व समाजात सर्वमान्य असे नेतृत्व होते. बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनाने मी एक चांगला, डॅशिंग मित्र गमावला आहे. त्यांच्या अचानक जाण्याचे मला तीव्र दुःख आहे. अतिशय जड मनाने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे सुपुत्र आ. झिशान सिद्दीकी व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, हीच प्रार्थना.
अशोक शंकरराव चव्हाण
महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. एका ‘वाय’ सुरक्षाप्राप्त व्यक्तीची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या होते तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय हा सवाल आहे. कायदा सुव्यवस्थेची स्थिती अतिशय दयनीय झालीय याचा ही घटना पुरावा आहे. हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. या घटनेमुळे सिद्दिकी कुटुंबाला झालेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र आमदार @zeeshan_iyc यांच्यासोबत आहेत. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
प्राजक्त प्रसाद तनपुरे