”प्रकाश बाबा आमटे….” लवकरच हिंदीत प्रदर्शित होणार
पुणे,
” प्रकाश आमटे यांचे अलौकिक असे सामाजिक कार्य केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील लोकांसमोर जावे या एकाच हेतूने मी ”प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो ” या चित्रपटाची निर्मिती केली त्यामागे व्यावसायिक दृष्टीकोन मुळीच नव्हता मात्र माझा हेतू साध्य झाला कारण या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला असे या चित्रपटाच्या लेखिका, निर्मात्या आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी सोमवारी पुण्यात सांगितले. तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी स्पर्धा विभागात ”प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो ” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना समृद्धी पोरे यांनी सांगितले की प्रकाश आमटे यांचे सामाजिक कार्यच एवढे मोठे होते की मला ते पडद्यावर साकार करताना फार सायास पडले नाहीत. त्यांच्या कार्याची इतरांनीही प्रेरणा घ्यावी या हेतूने मी हा चित्रपट तयार केला आणि माझ्या सुदॆवाने तो असंख्य प्रेक्षकांनी स्वीकारला याचेच मला जास्त समाधान आहे. हा चित्रपट भारतातील इतर प्रेक्षकांनी पाहावा यासाठी त्याची हिंदी आवृत्तीही लवकरच प्रदर्शित केली जाणार आहे असेही त्यांनी जाहीर केले. याप्रसंगी ”प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो ” या चित्रपटात ‘बाबा आमटे’ यांची भूमिका करणारे अभिनेते डॉ. मोहन आगाशे हेही उपस्थित होते. प्रारंभी लेखक व पत्रकार राज काझी यांनी उभयतांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले.
दिग्दर्शिका समृद्धी पोरे पुढे म्हणाल्या की. या चित्रपटात नाना पाटेकर, सोनाली, डॉ. मोहन आगाशे यांच्यासारखे दिग्गज कलाकार मनाजोगते मिळाले त्यांच्यामुळेच या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. हा चित्रपट तयार झाल्यानंतर तो पाहून स्वत: प्रकाश आमटे यांनी ”तू काय माझ्या जन्मापासून कैमेरा माझ्यावर ‘ऑन’ करून ठेवला होतास काय? ” या शब्दात प्रशस्तिपत्र दिले असेही त्यांनी सांगितले.
डॉ. मोहन आगाशे यांनी यावेळी बोलतांना, बाबा आमटे यांची भूमिका माझ्याकडे चालत आली आणि त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेवून कोणताही मेकअप न करता ‘मला उमगलेले बाबा’ ची मी छोटीशी भूमिका केली असे नम्रपणे सांगितले.