(जुने ते सोने म्हणतात … आणि ते खरे हि आहे अजूनही जुनी गाणी विस्मरणात जात नाहीत जुने संगीत जुने कलाकार , दिग्दर्शक यांनी इतिहास घडविला … गेलेले दिवस परत येत नाहीत म्हणतात पण गेलेला कलावंत … अन्य रूपाने तरी पुन्हा प्रगत व्हावा हि माफक अपेक्षा असते … काय वाटते सिनेसृष्टीतील मान्यवरांना आणि रसिकांना ? याबद्दलची चित्रे रेखाटणार आहेत मराठीतील नामवंत दिग्दर्शक शिव कदम … अनुभवू आणि पाहू यात शिव कदम यांच्या नजरेतून …. mymarathi.net )
मराठी भाषा अभिजात भाषा आहे. ज्या प्रमाणे महाराष्ट्राचा किंवा मराठीचा इतिहास दैदिप्यमान आहे तसाच मराठी सिनेमाचा इतिहास सुध्धा सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे. भारतात चित्रपटांची सुरुवातच मुळात मराठी मातीत झाली हे सर्वश्रुत आहे. त्या नंतर भारतीय चित्रपटांचा प्रत्येक टप्पा मराठी हातांनीच सजवलेला आहे. पण हे चित्र जेवढे सुंदर आणि आश्वासक वाटते तेवढीच आजच्या मराठी सिनेमाची स्थिती निराश करणारी दिसते. महाराष्ट्र शासन आणि काही ज्ञात अज्ञात एकांड्या शिलेदारांनी मरणासन्न झालेल्या मराठी सिनेमाला जिवंत ठेवण्याचे काम खूप कष्टाने केले. अनेक लोक अक्षरशः रस्त्यावर आल्याचे मी पाहिले आहे. त्यांच्या प्रयत्नांवर आणि हाल अपेष्टांवर एक स्वतंत्र लेखमाला होऊ शकते. तर या प्रयात्न्नांमुळे मराठी सिनेमा जेमतेम जिवंत राहू शकला. त्या नंतर “श्वास” चित्रपटा पासून मराठी सिनेमा पुन्हा उजळू लागला. आज व्यावसायिक मराठी सिनेमा डौलाने आपला संसार पुन्हा थाटू लागलाय. ३५ ते ४० कोटींपर्यंतकाही मराठी सिनेमांची कमाई झाल्याचे आपण ऐकत असतो. per day वर काम करणारे नट आता एका सिनेमाचे १० ते २० लाख रुपये आकारू लागलेत. लेखक आणि दिग्दर्शकांनी बॅंकां मध्ये काम करून सिनेमा करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. हे चित्र आश्वासक आहे. पण जगाच्या सिनेमात मराठीचे स्थान काय? भारतीय सिनेमात मराठीचे स्थान काय? एवढेच काय मराठी साहित्याच्या तुलनेत मराठी सिनेमाने किती लौकिक मिळवलाय? मराठी सिनेमा हि चळवळ राहिली आहे का? मराठी सिनेमाचे भविष्यातील सिनेमा मध्ये काय योगदान असणार आहे? या प्रश्नांची उत्तरं आम्हाला आता पासून शोधावी लागणार आहेत. ती सापडली नाही तर ती उत्तरं तयार करावी लागणार आहेत. सरकारी अनुदानाने मराठी सिनेमा तरलाही असेल, पण आता नवीन प्राण मिळाल्या नंतर जगाच्या क्षितिजावर आपले नाव कोरण्या साठी मराठी चित्रपटातील नवीन पिठीच्या पंखांना बळ देण्याचे, त्यांना नवी दृष्टी देण्याचे काम आता करावे लागणार आहे. नाहीतर मराठीला अनेक गोवारीकर, भांडारकर आणि कामत हिंदी सिनेमाच्या असेच स्वाधीन करत राहावे लागतील. “बाहुबली” मराठीत निर्माण नाही झाला तर त्याचे हिंदी डबिंग पाहूनच मराठी रसिकाला समाधान मानावे लागणार आहे. भाषा भाषांमधल्या सीमा रेषा पुसट होत असताना मराठी सिनेमाला सुध्धा भाषा धोरणात, सांस्कृतिक धोरणात मोलाचे योगदान देण्याची संधी निर्माण केली गेली पाहिजे. पूर्वी शासनाचं सांस्कृतिक खातं म्हणजे मंत्री महोदयांना इतर चार पाच खात्यांबरोबर मिळालेलं बोनस (किंवा डोकेदुखी) खातं समजलं जायचं. पण आता नवीन सरकार मध्ये हे खातं विनोद तावडें कडे असल्यामुळे सर्वांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेल्या लढाया नंतर आता मराठी सिनेमासाठी केवळ अनुदान नाही तर त्या बरोबर तावडेंनी एक धोरण द्यावं अशी अपेक्षा आहे.
प्रभात फिल्म कंपनीने ज्या प्रमाणे मराठी सिनेमाची एक चळवळ सुरु केली होती, जगाच्या पाठीवर मराठी सिनेमाचे स्थान निर्माण केले होते, त्या प्रमाणे मराठी भाषा जशी अभिजात आहे, तसा मराठी सिनेमा सुद्धा अभिजात व्हावा म्हणून , “पुन्हा एकदा प्रभात होण्याची” गरज आहे.
या लेख मालेत अनेक मान्यवर दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ यांच्या बरोबर आपली चर्चा होणार आहे. मला काहीतरी फार माहित आहे आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे असा कुठला हि अभिनिवेश इथे असणार नाही. आपण सर्वांनी मिळून, आपल्या मोलाच्या सूचनांचा स्वीकार करत २०२० मध्ये मराठी सिनेमा कसा असावा? या प्रश्नाचे अभिजात उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
मराठी सिनेमा विषयी आपल्या सूचना/प्रश्न directorshivkadam@gmail.com वर पाठवाव्यात.