क्रेडाईचे पुणे मेट्रोचे पंतप्रधानांना पत्र, शहराच्या जमेच्या बाजूंवर भर
पुणे – पुणे शहर हे केवळ स्मार्ट शहर म्हणून नव्हे तर स्मार्ट शहर आणि प्रदेश म्हणून विकसित करता येऊ शकते. पुणे हे केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरही राहण्यासाठी व व्यवसायासाठी सर्वोत्तम शहर म्हणून मान्यता पावले आहे. पुण्यातील पायाभूत सोईसुविधांमध्ये गुंतवणूक केल्यास महाराष्ट्राच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्याही आर्थिक विकासाला त्वरित चालना मिळेल, असे क्रेडाई पुणे मेट्रोने म्हटले आहे. संघटनेने पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी लिहिलेल्या या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष पुण्याच्या आर्थिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञानात्मक आणि औद्योगिकदृष्ट्या जमेच्या बाजूंकडे आणि ते महाराष्ट्र व पश्चिम भारताचे चैतन्यशील हृदय कसे बनू शकते, याकडे वेधण्यात आले आहे.
या पत्रात पुणे शहराला केंद्रस्थानी ठेवून पुणे शहर व आसपासच्या प्रदेशाचा विकास कसा करता येईल, याबाबत क्रेडाई पुणे मेट्रोने मुद्दे मांडले आहेत. “शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आणि निवृत्तीनंतर येणार्या ज्येष्ठ नागरिक, अशा सर्व वयोगटातील लोकांना पुणे आकर्षित करते. यामुळे एक शाश्वत व्यवस्था तयार झाली आहे. पुण्याच्या शहरी भागाच्या साक्षरतेचा दर (91.42%) हा देशातील 10 प्रमुख शहरी भागांमध्ये सर्वोच्च आहे. साक्षरतेच्या बाबतीत पुणे देशात 5 क्रमांकावर आहे. देशात येणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी 45% विद्यार्थी पुण्याची निवड करतात. साक्षरतेच्या या उच्च पातळीमुळे पुण्याचे लोक स्मार्ट सिटी ही संकल्पना समजून घेऊन तिचा स्वीकार करू शकतात आणि त्यामुळे तिची अंमलबजावणी अधिक सोपी व अधिक कार्यक्षम होऊ शकते,” असे या पत्रात म्हटले आहे.
पुण्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांची क्रयशक्ती जास्त असल्याची बाब या पत्रात अधोरेखित केली आहे. या सशक्त अर्थव्यवस्थेमुळे शेजारील गाव व खेड्यांमधील लोकांना रोजगार मिळू शकतो.
पुण्यातील मोठे वाहन उद्योग व अभियांत्रिकी कंपन्या, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, विक्रेत्यांचे सशक्त जाळे आणि मुंबईच्या बंदराशी जवळीक यांमुळे पुणे हे पांरपरिकरित्या निर्मितीचे केंद्र आहे. हे देशातील ई-व्यवहारांमध्ये सर्वात मोठ्या केंद्रांमध्ये 9व्या स्थानी असून जागतिक पातळीवर दुसरे सर्वाधिक आश्वासक आणि उभरते केंद्र म्हणून मानले गेले आहे. येथील माहिती तंत्रज्ञान व आयटी संबंधित सेवा कंपन्यांची एकूण निर्यात 3.5 अब्ज डॉलर्सची असून या कंपन्या 2.5 लाख अभियंत्यांना रोजगार पुरवितात,” या वस्तुस्थितीकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे विस्तारित पुणे शहर प्रदेशासाठी अगोदरच एक खिडकी प्राधिकरण अस्तित्वात आले असून सध्याच्या 3500 चौ. किमीवरून या प्रदेशाची हद्द दुप्पट होऊन 7000 चौ. किमी इतकी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुण्याचा विकास म्हणजे पुण्याच्या सभोवती 800 हून अधिक गावे व खेड्यांचा विकास, असा युक्तिवाद क्रेडाई पुणे मेट्रोने सादर केला आहे.
याशिवाय पत्रात म्हटले आहे, की या शहराला कला आणि संस्कृतीची मोठी परंपरा आहे त्यामुळे या शहराला विशिष्ट ओळख मिळाली आहे. येथील जीवनमान आणि भक्कम आर्थिक क्षमतेमुळे, या शहराचा केवळ शहर म्हणून नाही तर स्मार्ट प्रदेश म्हणून विकास करण्याची आवश्यकता आहे, असेही पत्रात म्हटले आहे.