शहर पोलिसांच्या वतीने पोलीस मुख्यालयात आयोजित मध्यवर्ती शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. बापट बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पोलीस आयुक्त के.के. पाठक, महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार व राजीव जाधव, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस सहआयुक्त सुनिल रामानंद, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, परिमंडळ पोलीस उपायुक्त आदी उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, पुण्याच्या गणेशोत्सवाला परंपरा आहे. या उत्सवाचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. त्यामुळे पुण्यातील मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना परंपरा आणि लौकिक याची कायम जाणीव ठेवावी. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांनी घ्यावी. मंडळांनी उत्सव साजरा करताना प्रशासनास सहकार्य करावे.
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलीस आयुक्त श्री. पाठक यांनी मंडळांना विविध परवानग्या मिळाव्यात यासाठी पोलीस विभागातर्फे एक खिडकी योजना अंमलात आणली आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन पोलीस विभागातील अधिकारी मंडळाच्या अडचणी सोडविण्यात तत्पर आहेत असे सांगितले.
सामाजिक बांधिलकी जपत काही गणेश मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत दिली. या मदतीचे धनादेश यावेळी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.