पुणे शहरातील रबरी स्पीडब्रेकर धोकादायक
पुणेशहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांची गती कमी करण्यासाठी बसविण्यात आलेले रबरी स्पीडब्रेकर वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. .हे स्पीडब्रेकर काढून टाकावेत, अशी मागणी पीपल्स युनियनचे निमंत्रक रमेश धर्मावत यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आव्हाड यांच्यासह पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.
चुकीच्या नियमांच्या आधारे बेकायदा पद्धतीने बसविण्यात आलेले हे स्पीडब्रेकर तातडीने काढून टाकावेत, अशी मागणी केली जात आहे. नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात आलेल्या या स्पीडब्रेकरमुळे वाहनचालकांची तारांबळ उडत असून, यामुळे अनेकांना पाठीच्या, तसेच मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार केली जात आहे.शहरातील रहदारीच्या अनेक रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीडब्रेकर बसविले जातात. वाहतूक शाखेच्या मान्यतेनंतर पालिका ते बसवते. हे स्पीडब्रेकर कसे असावेत, याबाबत इंडियन रोड काँग्रेसमध्ये मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आले आहेत. यामध्ये केलेल्या सूचनांनुसार रस्त्यांवर स्पीडब्रेकर बसविणे गरजेचे असते. मात्र, याकडे दुर्लक्ष करत चुकीच्या पद्धतीने रबरी स्पीडब्रेकर बसविण्याचा ‘प्रताप’ महापालिका प्रशासनाने केला आहे. वाहतूक शाखेने दिलेल्या मान्यतेनंतरच अशा पद्धतीचे स्पीडब्रेकर बसविण्यात आल्याचा खुलासा करून पालिका आपली जबाबदारी झटकून टाकत आहे.