पुणे, दि. 15 : अतिभारित झालेल्या पिंपरी उपकेंद्गाचा 50 टक्के वीजभार कमी करण्यासाठी रहाटणी 132 केव्ही उपकेंद्गातून नवीन 22 केव्ही क्षमतेची वीजवाहिनी रविवारी (दि. 15) कार्यान्वित करण्यात आली. या नवीन वीजवाहिनीमुळे पिंपरी व सांगवी परिसरातील सुमारे 32 हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
पिंपरी येथील 22/22 केव्ही उपकेंद्गातून पिंपरी व सांगवी परिसराला वीजपुरवठा केला जातो. पिंपरी उपकेंद्गातून निघणार्या एचए-1 या 22 केव्ही वीजवाहिनीद्वारे 12 मेगावॉट वीजपुरवठा केला जात होता. विजेची वाढती मागणी, नवीन वीजजोडण्या आदींमुळे पिंपरी उपकेंद्ग व एचए-1 ही 22 केव्ही वीजवाहिनी अतिभारित झालेली होती. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी रहाटणी 132 केव्ही उपकेंद्गातून नवीन 22 केव्ही वीजवाहिनी प्रस्तावित करण्यात आली होती. तथापि रस्ते खोदाईच्या अडचणींमुळे नवीन वाहिनीच्या कामास विलंब होत गेला. सुमारे साडेचार किलोमीटर लांबीच्या या नवीन वीजवाहिनीचे काम कार्यकारी अभियंता श्री. धनंजय औंढेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. धवल सावंत यांनी पिंपरी महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने नुकतेच पूर्णत्वास नेले. काही ठिकाणी ओव्हरहेड तर काही ठिकाणी ही वाहिनी भूमिगत आहे. रहाटणी 132 केव्ही उपकेंद्गातून निघालेल्या या नवीन 22 केव्ही वाहिनीद्वारे 6 मेगावॉटचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आता पिंपरी उपकेंद्गाचा व या उपकेंद्गातून निघालेल्या 22 केव्ही एचए-1 वीजवाहिनीवरील 6 मेगावॉटचा वीजभार कमी झाला आहे.
कार्यान्वित झालेल्या नवीन वीजवाहिनीमुळे पिंपरी गाव परिसरातील वाघेरे वस्ती, पिंपरी गाव, पिंपरी मार्केट या परिसरातील 12 हजार तसेच सांगवी परिसरातील काशिद पार्क, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, गुलमोहर कॉलनी, लक्ष्मीनगर, जवळकरनगर, भैरोनाथनगर परिसरातील सुमारे 20 हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. यासोबतच पिंपरी उपकेंद्गातील वीजभार निम्मा झाल्याने या उपकेंद्गातून निघणार्या श्रीनगर वाहिनी, जवळकरवस्ती वाहिनी, गणेशम वाहिनी, वाघेरे वाहिनी, पिंपरी गाव वाहिनीवरील वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.

