पुणे :
अॅमनोरा पार्क (हडपसर) येथे पाकिस्तानी गायक अतिक आस्लम यांच्या ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ कार्यक्रमाला शिवसेनेच्यावतीने विरोध करण्यात आला आहे. परंतु ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’ (साहित्य, कला, सांस्कृतिक विभाग) पुणे शहराच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 25 एप्रिल 2015 रोजी होणार आहे.
याविषयी लक्ष्मीकांत खाबिया (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, साहित्य, कला, सांस्कृतिक विभाग), आणि सनी मानकर (पुणे शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, साहित्य, कला, सांस्कृतिक विभाग) यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कलाकार हा कोणत्या जातीचा धर्माचा, पंथाचा नसतो. कलाकार हा कलाकारच असतो. जर भारतातील चित्रपट बाहेरील देशात प्रदर्शित होत आहेत, तर मग या कलाकारांना येथे संधी देण्यासाठी काय अडचण आहे? पाकिस्तानला विरोध करायचा असेल तर तुम्ही सीमेवर करा, कलाकारांना विरोध करू नका. शिवसेनेने एकेकाळी मायकल जॅक्सन याला भारतात आणून त्याला भारतात नाचण्याची संधी दिली होती. क्रिकेटचे खेळाडू शोएब अख्तर, वसिम अक्रम यासारखे दिग्गज खेळाडू भारतात राहतात. म्हणजे शिवसेना सोयिस्कर भुमिका घेत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा कार्यक्रम झालाच पाहिजे त्यासाठी कलाकारांनी त्यांची कला ही सादर केली पाहिजे या भुमिकेतून आम्ही या कलाकारांना पाठिंबा देत आहोत. कलाकार हा शेवटी कलाकारच असतो या उद्देशाने या कार्यक्रमास आमचा पाठिंबा आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.