सुरतमधील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी म्हणजे, शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकास कार्यातील महत्त्वपूर्ण झेप: पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी नवीन टर्मिनल इमारतीची फिरून प्रत्यक्ष पाहणी देखील केली.
या संदर्भात पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“सुरतमधील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी म्हणजे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकास कार्यातील महत्त्वपूर्ण झेप आहे. या अत्याधुनिक सुविधांमुळे प्रवासाचा आनंद अनुभवतानाच यामुळे आर्थिक विकास, पर्यटन आणि दळणवळणालाही चालना मिळणार आहे.”
यावेळी पंतप्रधानांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
पार्श्वभूमी
ही नवीन टर्मिनल इमारत गर्दीच्या वेळी 1200 देशांतर्गत प्रवासी आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वर्दळ हाताळण्यासाठी सुसज्ज आहे. या इमारतीची महत्त्वाच्या गर्दीच्या वेळेची क्षमता 3000 प्रवाशांपर्यंत वाढवून वार्षिक हाताळणी क्षमता 55 लाख प्रवाशांपर्यंत नेण्याची तरतूद आहे. ही नवी टर्मिनल बिल्डिंग, सुरत शहराचे प्रवेशद्वार असल्याने, इथली स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन ही इमारत निर्माण करण्यात आली आहे. इमारतीच्या आतील आणि बाहेरील बाजूला दोन्ही ठिकाणी येथील संस्कृती प्रतिबिंब व्हावी जेणेकरून अभ्यागतांमध्ये या स्थानाविषयी कुतुहलाची भावना निर्माण होईल याकडे लक्ष पुरवण्यात आले आहे. सुरत शहराच्या रांदेर भागातील जुन्या वास्तूंप्रमाणे पारंपरिक आणि समृध्द लाकडी कलाकुसर केलेल्या दर्शनी भागापासूनच नवी सुधारित विमानतळ वास्तू प्रवाशांना संपन्न अनुभव देण्यासाठी सिद्ध करण्यात आली आहे. ‘गृह-चार (GRIHA IV)’ अटींची पूर्तता करणारी नवी विमानतळ वास्तू विविध शाश्वत संतुलित वैशिष्ट्यांनी युक्त आहे. यामध्ये दुहेरी उष्णतारोधक छत, ऊर्जाबचत मंडप, कमीत कमी उष्णता शोषणारी दुहेरी चकचकीत आवरणाची एकके, पर्जन्यजलसंधारण, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे संयंत्र आणि सौर ऊर्जा निर्मिती- अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.