पुणे : महावितरणच्या भोसरी विभागअंतर्गत निगडी व रावेत परिसरात वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत 23 ठिकाणी 11 लाख 24 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. वीजचोरीच्या यातील 4 प्रकरणांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरी विभागाकडून नुकत्याच झालेल्या निगडी व रावेत परिसरातील वीजमीटर तपासणीच्या विशेष मोहिमेत 22 ठिकाणी घरगुती व एका ठिकाणी औद्योगिक वीजवापरासाठी चोरी होत असल्याचे आढळून आले. यात रावेत येथील तीन घरगुती व एका औद्योगिक वर्गवारीतील वीजचोरीत 95,000 युनिटची वीजचोरी आढळून आली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तर उर्वरित 19 वीजचोरीच्या प्रकरणांत कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राजेश गुजर, सहाय्यक अभियंता कल्याण जाधव, सुरेश पवार, कविता ढाके, तेजश्री म्हात्रे तसेच जनमित्रांनी ही विशेष मोहिम राबविली.


