पुणे – कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण यांच्या नियुक्तीचे शहरात वृत्त धडकताच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कॉंग्रेस भवनच्या प्रांगणात सोमवारी जल्लोष केला. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या शहरातील उमेदवारांचा पराभव झाल्यावर अभय छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पर्यायी नियुक्ती न झाल्यामुळे त्यांच्याकडेच प्रभारी सूत्रे सोपविण्यात आली होती. प्रदेशाध्यक्षांची आता नियुक्ती झाल्यामुळे शहराध्यक्ष केव्हा निवडले जातात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. तसेच इच्छुकांनी शहराध्यक्षपद मिळावे, यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.
खासदार चव्हाण यांच्या नियुक्तीचे आम्ही स्वागत करतो. तसेच त्यांची नियुक्ती केल्याबद्दल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करतो, असे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी म्हटले आहे. चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे पक्ष आणखी भक्कम होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय मजदूर संघातर्फे अध्यक्ष सुनील शिंदे यांनीही प्रदेशाध्यक्ष निवडीचे नियुक्तीचे स्वागत केले आहे. नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले, ‘चव्हाण हे तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षसंघटना आणखी भक्कम करतील. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पक्षाला राज्यात पुन्हा वैभवाचे दिवस चव्हाण आणतील.‘‘ या वेळी झालेल्या जल्लोषात प्रदेश कॉंग्रेस समितीचे प्रवक्ते रमेश अय्यर, शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस विठ्ठल थोरात तसेच नीलेश बोराटे, अंजनी निम्हण, लतेंद्र भिंगारे, सुनील घाडगे, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, सुजीत यादव, सुरेखा खंडागळे, सादिक लुकडे, मीरा शिंदे, प्रगती कांबळे, दयानंद अडागळे, प्रा. वाल्मीक जगताप, बबलू सय्यद, अमीन शेख, रोहित अवचिते आदी सहभागी झाले होते.