नव्या ठिकाणी भेट द्यायचीये? चिंता नाही, ‘व्हर्च्युअल गाईड’ आहे नं…
पुणे, ता : नवीन ठिकाणची अधिकृत माहिती मिळविण्याकरिता, त्या ठिकाणचे महत्व जाणून घेण्याकरिता अमोल चाफेकर यांनी नुकतेच ‘व्हर्च्युअल गाईड’ नावाचे अॅप तयार केले आहे. हे अॅप आपल्याला कुठल्याही प्रेक्षणीय स्थळाची, कुठल्याही भाषेमध्ये, लेखी, चित्रफितीद्वारे किंवा ध्वनिद्वारे अधिकृत माहिती पूरवेल. म्हणजेच एका मानवी गाईडचे काम हे अॅप त्यावेळी करेल.
“आपल्यापैकी अनेक जणांना नव नव्या ठिकाणी भेट द्यायची, तिथल्या गोष्टी जाणून घ्यायची हौस असते. काहींना ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची इच्छा असते तर काहींना निसर्गरम्य ठिकाणी जावेसे वाटते. अशा प्रेक्षणीय ठिकाणचे महत्वच जर आपल्याला माहिती नसेल तर त्या भेटीसही काही अर्थ उरत नाही. परंतु अनेकदा आपल्याला माहिती जाणून घ्यायची असते आणि त्या ठिकाणी उपलब्ध नसलेला मानवी गाईड किंवा तेथे उपलब्ध असलेली अर्धवट माहितीमुळे आपल्या पदरी निराशाच पडते. जरी मानवी गाईड तेथे उपलब्ध असला तरी तो किती अधिकृत असेल याचीही खात्री देता येत नाही. मग अशावेळी आपल्याला त्या ठिकाणची खरी माहिती कशी मिळेल याबाबत चिंतीत असाल तर चिंता करायची काहीही गरज नाही, ‘व्हर्च्युअल गाईड’ हे अॅप आपली सगळी चिंता दूर करील.” अशी माहिती या अॅपचे प्रणेते अमोल चाफेकर यांनी दिली. प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते त्यामुळेच या अॅपमध्ये विविध भाषांची निवड करता येईल असेही ते यावेळी म्हणाले.
व्हर्च्युअल गाईडची संकल्पना त्यांच्या मनात कशी आली याबद्दल त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, “एकदा आमच्याकडे जपानहून पाहुणे आले होते. त्यांना जेव्हा शनिवारवाडा दाखविण्यास घेऊन गेलो त्यावेळी आम्हा सर्वांकडेच त्याबद्दलची थोडकीच माहिती होती. त्या पाहुण्यांना ही माहिती पुरविताना आम्हालाच लाजिरवाणे वाटत होते. तेव्हाच मी ठरविले मी ‘व्हर्च्युअल गाईड’ हे अॅप तयार करण्याचे ठरविले.”
‘व्हर्च्युअल गाईड’मध्ये ‘पॉईन्ट टू पॉईन्ट’ शोधसेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाणचे एकमेव क्यूआर कोड तयार करण्यात आलेले असते. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणच्या क्यूआर कोडचे छायाचित्र काढून किंवा तो ‘इंफोरमेशन आयडी’ टाकून त्या ठिकाणाबद्दलची चीत्रफीत, ध्वनी किंवा लेखी माहिती आपल्याला हव्या त्या भाषेमध्ये उपलब्ध होऊ शकते. तसेच या अॅपमध्ये कुठलीही व्यक्ती एखाद्या ठिकाणाबद्दलची माहिती पुरवू शकतो, परंतु ती माहिती अधिकृत आहे किंवा नाही याबद्दल खात्री पटल्याशिवाय ती माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. तसेच आपल्याला बस स्टॉप वर बसच्या वेळा , जवळचे हॉस्पिटल, पोलिस स्टेशन, तसेच तेथील फोन नंबरची माहिती देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पुण्यातीलच एकूण ८७ प्रेक्षणीय स्थळं या अॅपमध्ये उपलब्ध होतील. तसेच काही जागांसाठी ते शासनाच्या परवानगीसाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच या अॅपमध्ये निशुल्क सेवा ठेवण्यात आली आहे.