ठाणे : देशाची सेवा करणारे विद्यार्थी घडविणारी शिक्षण व्यवस्था तयार करणे आवश्यक असून यादृष्टीने आजच्या शिक्षकांनी जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले.
शिक्षण विभागाच्यावतीने राज्यातील आदर्श शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात वितरित करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, ठाण्याचे महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, कपील पाटील, श्रीकांत शिंदे, प्रधान सचिव नंद कुमार, शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक नामदेव जरग, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने आदी उपस्थित होते.
जगामध्ये जे देश, समाज व्यक्ती घडवतात त्यांच्या जीवनात परिवर्तनाला अनुकूल वातावरण तयार करण्याचे काम शिक्षकांनी केले आहे. विद्यार्थ्यांवर चांगल्या संस्काराबरोबरच प्राविण्यप्राप्त विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करीत आहे. आई वडीलानंतर शिक्षक विद्यार्थ्यावर चांगले संस्कार करतात, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, समाजाची निस्वार्थपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करण्यात येईल, मात्र सामाजिक परिवर्तनाला पूरक अशा मागण्यांना जरुर प्राधान्य दिले जाईल. शिक्षणपद्धतीत बदल करण्यासाठी विद्यार्थी घडविण्याचे व राज्याच्या विकासाच्या दिशेने काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील.
शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, शिक्षण विभागाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. काही प्रमाणात शिक्षणपद्धतीत बदल करण्याचा विचार सुरु असताना आपले विद्यार्थी कुठे कमी पडतात हे शोधणे गरजेचे असून त्याला घडविण्यामध्ये आपण कुठे कमी पडतो हे शिक्षकांनी शोधले पाहिजे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौशल्य समुपदेश करुन त्यांच्यातील कौशल्य गुणांच्या आधारावर त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ध्वजनिधी, सैनिक निधी याबरोबरच शिक्षकनिधी असल्याचे सांगून या निधीसाठी माझे एक महिन्याचे वेतन मी देत असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले. चांगले कार्य करणाऱ्या शाळांची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्रधानसचिव नंदकुमार यांनी प्रास्ताविकात केले. 2014-2015 मध्ये राज्यातील 106 शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले असून यामध्ये प्राथमिक शिक्षक 37, माध्यमिक शिक्षक 38, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक 18, कला व क्रीडा शिक्षक 2, स्काऊट गाईड शिक्षक 2, विशेष अपंग शिक्षक 1 तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिक्षिका विभागातून एक याप्रमाणे 8 शिक्षकांचा समावेश असून पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, टॅबलेट पी.सी., रोख रक्कम दहा हजार व दोन आगाऊ वेतनवाढीऐवजी 1 लाख रुपये रोख असे पुरस्कार म्हणून देऊन गौरविण्यात येत आहे.
या कार्यक्रमास आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, शांताराम मोरे, रामनाथ मोरे, श्रीमती मंदा म्हात्रे व जिल्हापरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त, शिक्षक व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.