‘दगडी चाळ’ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतरमंगलमूर्ती फिल्म्स लवकरचं बनवणार आहे
दगडी चाळ – 2…कलाकारांचा उत्तम अभिनय, सुमधूर संगीत, सुनियोजित दिग्दर्शन,
रोमांचकारी कथानक या सगळ्याच पार्श्वभूमीवर प्रेक्षकांनी दगडी चाळ हा चित्रपट डोक्यावर
उचलून धरला. या चित्रपटानंतर त्याच ताकदीचा दगडी चाळ – 2 प्रेक्षकांसमोर सादर
करण्याचा निर्मात्या संगीता अहिर यांचा मानस आहे. त्याच्या कथेवर सध्या काम सुरू आहे.
आपण दगडी चाळ – 2 मधून मकरंद देशपांडेला पुन्हा डॅडी च्या भूमिकेत पाहणार आहोत.
इतर कलाकारांच्याबाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र हा चित्रपट 2016 मध्ये
प्रदर्शित होईल हे मात्र नक्की…
महाराष्ट्रात ‘दगडी चाळ’वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता संपूर्ण भारत आणि
भारताबाहेरही हा चित्रपट नेण्याचा विचार असल्याचे संगीता अहिर म्हणाल्या. यानिमित्ताने
दुबई, लंडन, सिंगापूर याठिकाणी राहणाऱ्या मराठी माणसांपर्यंत हा चित्रपट पोहोचणार आहे.
कॅलेंडर गर्ल्स, गुड्डू रंगीला, सिंह साहेब दि ग्रेट, अपने, लाईफ हो तो ऐसी, यासारख्या हिंदी
चित्रपटांच्या निर्मितीचं शिवधनुष्य लिलया पेलल्यानंतर दगडी चाळच्या निमित्ताने त्यांनी
मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. एका उत्तम चित्रपटाच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या गोष्टी
आणि निर्मितीमूल्यांचं गणित कसे मांडावे याविषयी बोलताना मराठी चित्रपटांचे मार्केटिंग होत
नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावर तोडगा म्हणून मराठी चित्रपटांच्या मार्केटिंगचं
मार्केट होण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या आणि यासाठी त्या नेहमीचं प्रयत्नशील
असतील असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. येत्या काळात मंगलमूर्ती फिल्म्स
प्रोडक्शनबरोबरच डिस्ट्रिब्युशनच्या क्षेत्रातही उतरणार आहे.

