यंदाच्या सुट्टीत बच्चेमंडळीसाठी झी टॉकीज डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चित्रपटांचीखास भेट घेऊन येणार आहे. मराठी मनोरंजनाच्या इतिहासात प्रथमच मराठी भाषेत डब केलेले डिस्नेचे धमाल चित्रपट झी टॉकीजच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटांना मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार मंडळींनी आवाज दिला आहे.
‘द लायन किंग’, ‘फाईंडिंग निमो’, ‘सिंड्रेला’, ‘ब्युटीअॅण्ड द बिस्ट’, ‘ब्रेव्ह’, ‘अप’ आणि ‘वॉल-इ’ अशा सात गाजलेल्या अॅनिमेशनपटाची मेजवानी लहानांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांनाच घेता येणार आहे. महेश मांजरेकर, आदिनाथ कोठारे, केतकी माटेगावकर, अपेक्षा दांडेकर यांसारख्या अनेक मान्यवरांनी लहानग्यांच्या या आवडीच्या सिनेमांना आवाज देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला आहे. कलाकार मंडळी स्वतः डिस्ने अॅनिमेशन चित्रपटाचे चाहते असल्यामुळे प्रत्येकाने तितक्याच उत्साहाने झी टॉकीजच्या या नव्या प्रयोगाला साथ दिली.
‘द लायन किंग’ या चित्रपटाला महेश मांजरेकर, आदिनाथ कोठारे यांनी आवाज दिला आहे तर ‘सिंड्रेला’ या चित्रपटात केतकी माटेगावकरचा आवाज ऐकायला मिळेल. या अॅनिमेटेड फिल्म्सचा आस्वाद येत्या ३ मे पासून दर रविवारी दुपारी १२ वाजता आणि पुनः प्रसारण सायंकाळी ६ वाजता पाहता येईल. डिस्ने चित्रपटांचा हा महोत्सवछोट्या पडद्यावर चांगलीच धमाल करेल. झी टॉकीजवर दाखवण्यात येणाऱ्या डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चित्रपट महोत्सवामुळे बच्चेमंडळी व त्यांचे पालक फूल टू धमाल करणार आहेत.
दाखवण्यात येणारे हे सात सिनेमे निव्वळ मनोरंजन करणारे नाहीत, तर या प्रत्येक चित्रपटांमधून मौलिक संदेश ही दिला गेला आहे. ‘वॉल-इ’ या सिनेमातून पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरू पाहणाऱ्या माणसाला जागं करणारं वास्तव दाखवलं आहे. निमो’ ह्या सिनेमात माशाच्या प्रवासाचं नाट्य रंगवलं आहे. या चित्रपटातून समुद्र विश्वाचं अफलातून दर्शन घडेल. मुलांमध्ये असलेल्या डिस्नेच्या अॅनिमेशन चित्रपटाचं हे वेड लक्षात घेऊनच झी टॉकीज ने हा निर्णय घेतला आहे. बालगोपाळांना अपील होणारे चित्रपट व त्यांची अभिरुची जाणून घेत झी टॉकीजने हा आगळा प्रयोग केला आहे.
झी टॉकीज महाराष्ट्रातील मराठी चित्रपट रसिकांची खास जिव्हाळ्याची चित्रपट वाहिनी असून गेल्या काही वर्षातच या वाहिनीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. मराठी चित्रपटांचा मूल्यवान खजिना झी टॉकीज वाहिनीने जपला आहे. या चित्रपटांना रसिकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद दिलाय. रसिकांनी दिलेल्या या भरभरून प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना झी टॉकीज ने मनोरंजनाचे अनोखे नजराणे पेश केले आहेत. झी टॉकीजच्या या नित्य नव्या प्रयत्नांना रसिकांनीही खूप उचलून धरले आणि म्हणूनच मनोरंजनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी झी टॉकीजला सतत प्रोत्साहन मिळत आले. याच उत्साहातून अनेक गाजलेले चित्रपट, अनेक क्लासिक चित्रपटांचे महोत्सव, कॉमेडी चित्रपटांची जत्रा यासोबतच सिनेताऱ्यांच्या भेटी किंवा चित्रसृष्टीचे देदीप्यमान सोहळे रसिकांना घरबसल्या अनुभवता आले.
वैविध्यपूर्ण मनोरंजनाची ही वैभवशाली परंपरा जोपासत झी टॉकीज या सुट्टीत आपल्या छोट्या दोस्तांसाठी एक खास आश्चर्यकारक भेट घेऊन दाखल होतेय. अॅनिमेशन चित्रपटांची ही जादुई दुनिया केवळ छोट्या मित्रांसाठीच नव्हे तर कुटूंबातल्या प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरावी, असे वाटतेय. झी टॉकीजवरील या चित्रपटांमुळे छोट्या दोस्तांची यावेळची सुट्टी आणखीनच बहारदार होइल. मनोरंजनाचा हा आगळा वेगळा धमाका झी टॉकीजच्या आजवरच्या प्रवासातला आणखी एक परमोच्च बिंदू ठरेल अशी आशा आहे. असे झी टॉकीज चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले.
डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चे चित्रपट प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्याप्रमाणात वितरीत करण्यासठी डिस्ने आणि डिस्ने पिक्सार ने नेहमीच पुढाकार घेतला आहे.