ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांच्या “मराठी काव्यसप्ताह- 2015′ चे आयोजन
पुणे :
मराठीमधील ज्येष्ठ कवी रमेश गोंविंद वैद्य हे दरवर्षी काव्यसप्ताह’ साजरा करतात. कवितावाचनाचे कार्यक्रम जनमानसात अधिक रुजावेत, नवोदितांना उत्तेजन मिळावे या उद्देशाने कवी रमेश वैद्य यांनी सुरू केलेला ‘काव्यसप्ताह’ हा उपक्रम एव्हाना पुणेकरांना सुपरिचित झाला आहे. यंदा हा उपक्रम 16 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. ‘काव्य सप्ताहर्-2015’ 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत भारत स्काऊट अॅण्ड ग्राउंड सभागृह, उद्यान प्रसाद कार्यालयसमोर, सदाशिव पेठ, पुणे 30 येथे सायंकाळी 7 वाजता साजरा होईल, अशी माहिती संयोजक राजेंद्र देशपांडे आणि माध्यम समन्वयक दीपक बिडकर यांनी दिली .
‘काव्यसप्ताह’ आणि कवी रमेश गोविंद वैद्य हे एक अजोड नाते आहे. पुण्यात सातत्याने 14 वर्षे या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर पंधरावा काव्यसप्ताह (2014 चा) मुंबईत दादरमध्ये घ्यावा, असे वैद्यांच्या मनात आले. ही कल्पना त्यांनी काही प्रस्थापित व नवोदित कवी-कवयित्रणींनी बोलून दाखवताच त्यांनी ती उचलून धरली. हे स्वप्न साकार करायचेच या जिद्दीने वैद्यांनी मार्च 2014 पासूनच पाऊले टाकण्यास सुरुवात केली.
पुण्यातील काव्यप्रतिभेचे दर्शन मुंबईकरांना घडवण्यासाठी गतवर्षीचा काव्यसप्ताह मुंबईमध्ये चक्क दादरमध्ये घेण्याचे यशस्वी साहस वैद्यांनी करून दाखविले.
सलग सात दिवस काव्यासंबंधी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे, नव्या-जुन्या कवींना कार्यक्रमात संतुलित स्थान देणे, सगळ्या लहान-मोठ्या तपशीलांकडे लक्ष पुरवित काव्य मैफलींचे नियोजन करणे आणि हे सर्व स्वत:कडे कुठलेही श्रेय न घेता करणे हे रमेश गोविंद वैद्यांचे वैशिष्टय आहे.