पुणे-
ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गजेंद्र अहिरेंच्या ‘दी सायलेंस’ची वर्णी लागली आहे.
मेक्सिको, बेल्जियम, पराग्वे, जर्मनी, बल्गेरिया, क्यूबा, अर्जेंटीना या देशातल्या चित्रपटांबरोबर यंदा
पहिल्यांदा भारत स्पर्धा करणार आहे. एस.एम.आर प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘दी सायलेंस’ ने हा मान
भारताला मिळवून दिला आहे. एकंदर आठ चित्रपटांची स्पर्धा या ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवात होणार आहे. 6 ते 15 नोव्हेंबर दरम्यान ब्राझीलमध्ये होणाऱ्या या चित्रपट महोत्सवात
प्रेक्षकांना ‘दी सायलेंस’चा आनंद घेता येणार आहे. नेहमीचं काहीतरी नवीन देऊ पाहणाऱ्या गजेंद्र
अहिरेंचा ‘दी सायलेंस’ अशाच एका वेगळया विषयावर भाष्य करतो. हाचं वेगळेपणा ‘दी सायलेंस’
चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत वाह…! वाह..! मिळवून देत आहे.
याआधी ‘दी सायलेंस’ने जर्मनमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये मान मिळवला आहे. या
चित्रपटासाठी गजेंद्र अहिरेंना जर्मन स्टार ऑफ इंडिया 2015 च्या ‘डायरेक्टर्स व्हिजन’ पुरस्काराने
गौरवण्यात आले आहे.
हा चित्रपट सत्यकथेवर आधारीत आहे. कोकणात राहणाऱ्या चिनीची व्यथा या चित्रपटात मांडण्यात
आली आहे. आपल्या बाबांबरोबर राहणाऱ्या चिनीच्या आयुष्यातील एक काळा दिवस आणि आयुष्याच्या
प्रत्येक वळणावर सोबत करणाऱ्या त्या आठवणी दी सायलेंसमध्ये चित्रित करण्यात आल्या आहेत.
दुष्कृत्य करण्यासाठी हपापलेले हात आणि त्यामुळे कोवळ्या जीवांची अकारण होणारी फरफट गजेंद्र
अहिरेंचा ‘दी सायलेंस’ सांगून जातो.
समाजात वाढत चाललेल्या दुष्प्रवृत्तींवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात नागराज मंजुळे, कादंबरी कदम
आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतील. हिंदीत नाव मिळवल्यानंतर अंजली पाटील पहिल्यांदाचं दी
सायलेंस चित्रपटातून मराठी सिनेमात येत आहे. त्याशिवाय हिंदीतला गाजलेला चेहरा रघुवीर यादव
आपल्याला मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तर ‘दी सायलेंस’ च्या निमित्ताने मुग्धा चाफेकर आणि
वेदश्री महाजन हे नवीन चेहरे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
अश्विनी सिद्वानी, अर्पण भुखनवाला आणि नवनीत हुल्लड मोरादाबादी यांनी या चित्रपटाची निर्मिती
केली असून अश्विनी सिद्वानी यांनी चित्रपटाची कथाही लिहिली आहे. पटकथा, संवादलेखन आणि
दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकेत गजेंद्र अहिरे आपल्याला दिसणार आहेत. छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा
सोरेन यांचं असून चित्रपटाचं संकलन मयुर हरदास यांनी केले आहे. या चित्रपटाची जमेची बाजू
म्हणजे त्याचं संगीत…’दि सायलेसं’ च्या निमित्ताने इंडियन ओशन हा रॉक बँड मराठी सिनेसृष्टीत
पदार्पण करतो आहे.