पुणे : शिक्षण अर्धवट सोडून नव्हे तर शिक्षण पुर्ण करुनच अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रवेश करावा असा संदेश ‘जय मल्हार’ फेम बानू ऊर्फ ईशा केसकर यांनी दिला. तसेच सहकारनगर मध्ये राहणारा समिर पुराणिक हा माझ्या वास्तव जीवनातील खंडोबा असून येत्या काही दिवसात आम्ही दोघे विवाहबध्द होणार असल्याचे त्यांनी प्रथमच सांगितले.
खंडाळे चौक, तळजाई वसाहत येथे सुमनताई जगताप चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भव्य हळदी-कुंकू व तीळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी परिसरातील हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेविका उषाताई जगताप, अॅड.शालिनीताई डबीर व रोहिनी महाजन उपस्थित होत्या.
केसरकर यांनी ‘जय मल्हार’ मालिकेत साकारत असलेल्या बानू या भूमिकेविषयी सर्वांना अनुभव सांगितले. तरुण व विशेष करुन युवतींनी मोठी ध्येय बाळगून ती पुर्ण करण्यासाठी जाणीवपुर्वक कष्ट करायला हवे असे सांगितले. त्यांनी मालिकेमधील बानूच्या भूमिकेतील संवादाप्रमाणेच उपस्थितांशी संवाद साधला. तसेच त्यांनी जय मल्हार मालिकेच्या टायटल गीताचे गायन केले.
जगताप म्हणाले, सध्या मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढली असून मुलींनी स्वावलंबी होण्यासाठी निर्माण झालेल्या नवनव्या रोजगाराच्या संधींचा शोध घ्यायला हवा. शासन व स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना व उपक्रम आहेत, त्याचा महिलांनी लाभ घ्यावा.
उपस्थित महिलांसोबत बानू ऊर्फ ईशा केसकर यांनी हळदी-कुंकू व तीळगुळ कार्यक्रमात सहभाग घेतला. बानू ऊर्फ ईशा केसकर यांच्या शुभहस्ते महिलांना वानाचे वाटप करण्यात आले.