मुंबई – नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (मंगळवार) सकाळी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक आणि मुंबईतील विविध घरांवर व कार्यालयांवर छापे टाकले.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये सकाळी ९ ते ११च्या दरम्यान छापे टाकले. तेथील कार्यालयातून काही कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली आहेत. दुसरीकडे मुंबईतील घर व कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले आहेत. मुंबईतील छाप्यातून नेमके काय हाती आले आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. गरज पडल्यास आणखीही छापे टाकले जाऊ शकतात, असे सूत्रांकडून समजते.
नाशिकमधील छगन भुजबळ यांचे निवासस्थान तसेच कार्यालयांवर मंगळवारी सकाळी छापे टाकण्यात आले. त्याचवेळी मुंबईतील सांताक्रुझ, दादर, शिवाजी पार्क येथेही त्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईतील अधिकाऱयांनी हे छापे टाकले. एकूण २० ते २५ अधिकारी या छापेसत्रात सहभागी झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
एसीबी व अमलबजावणी संचलनालयानं भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध विविध घोटाळ्याचा गोपनीय अहवाल सादर केला होता. त्यानंतर भुजबळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल होताच एसीबीने घोटाळेबाज अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकले. या छाप्यांतून कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे घबाड हाती लागले होते. अधिकाऱ्यांवरील छाप्यानंतर भुजबळ हेही एसीबीच्या रडारवर आले होते. अखेर आज त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळली.
महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीमार्फत चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा झाल्याचे नमूद करून छगन भुजबळांसह पंकज व समीर भुजबळ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अरुण देवधर, दीपक देशपांडे, मुख्य अभियंता माणिक शहा, मुख्य वास्तुशास्रज्ञ बिपिन संख्ये, कार्यकारी अभियंता अनिलकुमार गायकवाड या अधिकाऱ्यांसह चमणकर इंटरप्राईझेसचे कृष्णा चमणकर, प्रसन्न चमणकर, प्रवीणा चमणकर, प्रणिता चमणकर तसेच भुजबळपुत्रांच्या कंपनीशी संबंधित कर्मचारी तन्वीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ यांची पाठराखण केली आहे. भुजबळ यांनी कोणतंही बेकायदा काम केलेलं नाही. भाजपचं सरकार सूड भावनेनं व आकसानं ही कारवाई करत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठीच ही मोहीम चालवली जात आहे,’ असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.