नवी दिल्ली- सतीश शेट्टी यांचे मारेकरी सापडत नाही म्हणून कोर्टाला क्लोजर रिपोर्ट देणाऱ्या सीबीआयने चार महिन्यापूर्वी दिल्लीत झालेल्या दिवगंत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचा निर्वाळा दिला आहे. सीबीआयने केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबतचा अहवाल आज सादर केला. त्यात ही बाब पुढे आली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री गडकरींवर हल्ला होण्यामागे मुंडेंच्या मृत्यूची चौकशीबाबत सरकार टाळाटाळ करीत असल्याने वंजारी समाजाच्या तरूणाने नैराश्यातून गडकरींवर बूट उगारल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याने भाजपनेच हा अहवाल तत्काळ पुढे आणण्याच्या जोरदार हालचाली केल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने प्रसिध्द केले आहे
मोदी सरकारने जुलै महिन्यात मुंडेंच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी मान्य करीत सीबीआयला तसे आदेश दिले होते. आता तीन-चार महिन्यानंतर सीबीआयने मुंडेंच्या अपघाती मृत्यूचा अहवाल तयार करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विभागाकडे सादर केला आहे. हा अहवाल अधिकृतरित्या जाहीर केला नसला तरी त्यातील निष्कर्ष बाहेर आला आहे. यात मुंडेंच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचा निर्वाळा सीबीआयने दिला आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना सोमवारी रात्री पुण्यातील कोथरूड भागात बूट मारण्याचा प्रयत्न झाला ज्या माथेफिरू तरूणाने गडकरींवर बूट उगारला त्याचे नाव भारत कराड असून तो वंजारी समाजाचा व भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी जरी या माथेफिरूने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगीतले असले तरी याबाबत नानाविध शंका उपस्थित केल्या जात आहेत
विरोधकांसह भाजपमधील अनेक नेत्यांनी मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर या चर्चेला आणखीच तोंड फुटले होते. गडकरी-मुंडे यांच्यातील राजकीय वितृष्टामुळे मुंडे समर्थकांत गडकरींबाबत रोष आहे. त्यामुळेच मुंडेंच्या अंत्यविधीला गडकरींना भाजपमधील काही मंडळींनी जाऊ दिले नव्हते. एवढेच नव्हे तर आता गडकरींना बीडमध्ये प्रचारालासुद्धा येऊ दिले नाही. मुंडेंचा अपघाती मृत्यू हा वंजारी समाजासाठी मोठा धक्का होता. . अखेर भाजपने यावर पडदा टाकत सीबीआयचा अहवाल पुढे आणला आहे.