गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निर्माता अनिल मोरानींच्या घराबाहेर रवी पुजारी टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर शाहरूख खान, आमीर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, फराह खान आणि निर्माते विदू विनोद चोपडा यांना रवी पुजारी टोळीचे धमकीचे फोन आले होते. यामुळे पोलिस सतर्क झाले. आणि त्यांनी सर्वांच्या सुरक्षेत वाढ केली. पण आता ही सुरक्षा कमी करण्यात येणार आहे.
‘गेल्या वर्षी झालेल्या गोळीबारामुळे बॉलिवूड स्टार्सच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पण आता त्यांना कुठलाही धोका नाहीए. त्यामुळे त्यांची वाढवलेली सुरक्षा कमी करायला काहीही हरकत नाही’, अशी शिफारस गुन्हे विभागाने केली आहे. ‘मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया आता यावर निर्णय घेतील’, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
शाहरूख, सलमान आणि आमीर खान तिघा अभिनेत्यांना सशस्त्र पोलिसांचे कवच आणि एक पोलिस गाडी अशी सुरक्षा देण्यात आली आहे. तर हिरानी, फराह खान आणि चोपडा यांना पोलिस गाडीचे सुरक्षा कवच दिले गेले आहे.