नगर- भारतीय जनता पक्षासह काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकही लायक चेहरा नाही. तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय? धरणे भरणारा, की दिल्लीपुढे शेपूट हलवणारा, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी येथे केला.
नगरशहर व जिल्ह्यातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी गांधी मैदानात घेण्यात आलेल्या सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी सुहास सामंत, अनिल राठोड, विजय औटी, साहेबराव घाडगे, लहू कानडे, शशिकांत गाडे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर व शीला शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते. करे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही. काँग्रेस व भाजपकडे दिल्लीपुढे शेपूट हलवणारेच लोक आहेत. आता तर त्यांना शेपूट हलवण्यासाठीदेखील परवानगी घ्यावी लागते, अशा खिल्ली ठाकरे यांनी उडवली.
महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे. त्यामुळे युती तुटल्याचे दु:ख नाही. शिवसेनेच्या तिन्ही पिढ्यांनी कधीच विचार सोडले नाहीत. भाजपच्या नव्या पिढीने मात्र स्वार्थासाठी २५ वर्षांची युती तोडली. युती तोडली म्हणजे त्यांनी हिंदुत्वाशी नाते तोडले आहे. पूर्वीचे भगवे कमळ आता भगवे राहिले नसून ते आता पांढरे झाले आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. पंधरा वर्षे सत्तेत राहिलेले दोन्ही काँग्रेस व शिवसेनेच्याच बळावर केंंद्रात सत्तेवर असलेले भाजपवाले आता महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठी फौज घेऊन येत आहेत. अफजल खानाच्या नावाची टोपी मी भिरकावली, परंतु त्यात भाजपने डोकं घातले, यात माझी काय चूक आहे? असे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र हे शिवरायांचे राज्य आहे. त्यामुळे दिल्लीत कितीही शहा असले, तरी त्यांच्यापुढे झुकणार नाही. भाजपच्या अटी मान्य केल्या असत्या, तर दिल्लीपुढे हुजरेगिरी करावी लागली असती. हे जनतेला मान्य झाले असते का? सत्तेच्या लालसेपोटी सेनेची कत्तल होऊ देणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
कोण मुख्यमंत्री हवाय? धरणे भरणारा, की दिल्लीपुढे शेपूट हलवणारा ?
Date:

