पुणे – पुण्यात सर्वच्या सर्व आमदार भाजपचे आहेत या सर्व आमदारांपुढे आता शहरात ..असदद्दुदीन ओवेसी यांच्या एम आय एम ला कसे रोखणार ? हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे कारण कोंढव्यात महापालिकेच्या प्रभागातील पोटनिवडणुकीत उतरण्याचे एमआयएमने ठरविल्याने या निवडणुकीत आता रंग भरले जाण्याची शक्यता आहे. मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या या भागातील ही लढत महापालिकेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार असून, औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील निवडणुकीबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
“ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन‘ (एमआयएम) ने मुस्लिम मतांच्या जोरावर जोरदार फिल्डिंग लावली आहे. आपला किल्ला शाबूत ठेवण्यासाठी शिवसेना सरसावली आहे मात्र त्याचबरोबर भाजप, कॉंग्रेस आणि मनसेही नशीब अजमावणार आहे. परिणामी, मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असल्याने या निवडणुकीमुळे नवी राजकीय समीकरणे आकारला येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नगरसेवक भरत चौधरी यांचे पद रद्द झाल्याने कोंढव्यातील प्रभागासाठी (क्र.63 अ) येत्या एक नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू झाली असून, सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सुमारे 42 हजार 700 मतदार असलेल्या या प्रभागात 50 टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा होईल, या आशेने “एमआयएम‘ने या निवणुकीवर लक्ष केंद्रित केले असून, पक्षाचे कार्यकर्ते मझहर मणियार यांना उमेदवारी देऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. विशेष म्हणजे, पक्षाचे नेते खासदार असदद्दुदीन ओवेसी यांच्या सभेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे “एमआयएम‘च्या आशा उंचावल्या आहेत. या प्रभागात गेल्या 30 वर्षांपासून एकतर्फी विजयी मिळविणारी शिवसेना आपला गड राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. स्थानिक कार्यकर्ते सोमनाथ हरपुडे यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विजयासाठी माजी आमदार महादेव बाबर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे; तर भाजपने सतपाल पारगे यांच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. याशिवाय कॉंग्रेसने माजी नगरेसवक अनिस सुंडके यांचे बंधू रईस यांना मैदानात उतरविले आहे. अमोल शिरस यांना उमेदवारी देऊन कोंढव्यात ताकद वाढविण्याचा मनसेचा इरादा आहे. राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार दिलेला नाही.