पुणे, : महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या कृषिसंजीवनी योजनेस येत्या 31 मार्च 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे उर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे.
कृषिसंजीवनी योजनेअंतर्गत कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे दि. 31 मार्च 2014 अखेर असलेल्या मूळ थकबाकीची 50 टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरल्यास मूळ थकबाकीची उर्वरित 50 टक्के रक्कम माफ होणार आहे. ही रक्कम राज्य शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरुपात देण्यात येणार आहे. तसेच दि. 31 मार्च 2014 ला शेतकऱ्यांकडे असलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेवरील व्याज व दंड महावितरणकडून माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जून 2014 नंतर आलेली चालू वीजबिले भरणे आवश्यक आहे.
कृषिसंजीवनी योजनेच्या धर्तीवरच राज्यात पाणीपुरवठा संजीवनी योजना 2015 सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी दिली. पाणीपुरवठा योजनांच्या जून 2015 अखेर असलेल्या वीजबिलांच्या मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम एकरकमी किंवा दहा समान हप्त्यांत भरावयाची आहे. या मूळ थकबाकीची उर्वरित 50 टक्के रक्कम आणि व्याज व दंडाची 50 टक्के रक्कम महावितरणला राज्य शासनाकडून अनुदान स्वरुपात देण्यात येईल. तर महावितरणकडून 50 टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जुलै 2015 पासूनची चालू वीजबिले भरणे आवश्यक आहेत.